Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत १६ उमेदवारांनी नावे जाहीर करण्यात आली आहे. यात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनाही अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, सचिन सावंत यांनी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तर त्यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती आणि याच ठिकाणी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्ती होती. तरीही सचिन सांवत अंधेरी पश्चिममधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे आता सचिन सावंत यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे आपला निर्णय बदलावा, अशी विनंती केली आहे.
सचिन सावंत यांनी यासंदर्भात एक्सवर ट्विट केले आहे. ते म्हणाले, "मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तीथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नितला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो."
सचिन सावंत यांना मागितलेली वांद्रे पूर्व ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आहे. या मतदारसंघातून ठाकरे गटाने वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिली आहे.वरुण सरदेसाई यांना उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्मही दिला आहे. त्यामुळे आता सचिन सावंत यांच्याबाबतीत काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, काँग्रेसने पहिल्या यादीत ४८ उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर दुसऱ्या यादीत २३ आणि आता तिसऱ्या यादीत १६ उमेदवार जाहीर केले. काँग्रेसच्या एकूण उमेदवारांची संख्या ८७ झाली आहे.
काँग्रेसची तिसरी यादीखामगाव-दिलीपकुमार राणा, मेळघाट – हेमंत चिमोटे, गडचिरोली – मनोहर पोरेटी, दिग्रस – माणिकराव ठाकरे, नांदेड दक्षिण – मोहनराव अंबाडे, देगलूर – निवृत्तराव कांबळे, मुखेड – हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, मालेगवा मध्य – एजाज बेग अजीज बेग, चांदवड – शिरीषकुमार कोतवाल, इगतपुरी – लकीभाऊ जाधव, भिवंडी पश्चिम – दयानंद चोरघे, अंधेरी पश्चिम – सचिन सावंत, वांद्रे पश्चिम- असिफ झकेरिया, तुळजापूर – कुलदीप धीरज अप्पासाहेब कदम पाटील, कोल्हापूर उत्तर – राजेश लाटकर, सांगली – पृथ्वीराज पाटील