मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता पहिल्यांदाच दोन्ही गटाचे नेते एकमेकांवरिद्ध शाब्दीकरित्या भिडल्याचं दिसून आलं. मंत्री छगन भुजबळ यांनी जयंत पाटलांना लक्ष्य केलं, तर अजित पवारांनीजितेंद्र आव्हाडांवर थेट निशाणा साधला. अजित पवारांनी आपल्या भाषणात तो ठाण्याचा पठ्ठ्या असं म्हणत आव्हाडांमुळेच ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते पक्ष सोडून गेल्याचे सांगितले. तसेच, जसं काही काही पक्षाचे प्रवक्ते बोलून चांगल्याचं वजवाटोळं करतात, त्याचप्रमाणे ती व्यक्ती तिथं वजवाटोळं केल्याशिवाय राहणार नाही, असं माझं ठाम मत असल्याचंही अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या टीकेला आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय.
ठीक आहे चांगलंय, अजित दादांना मी गुन्हेगार वाटत असेल तर चांगलंय. एखाद्या माणसाला गुन्हेगार ठरवायला एकदम सोपं असतं. शरद पवारांना राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन हटवा असं तुम्ही निवडणूक आयोगाला सांगितलंय. पण, तेही खोटं सांगितलंय. शपथ घेईपर्यंत तुम्ही राष्ट्रवादीतच होतात, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री आणि बंडखोर नेते अजित पवार यांच्यावर पलटवार केला. तसेच, आपल्या काकाची, आपल्या निर्मात्याची, आपल्या बापासारखी भूमिका घेतलेल्या साहेबांची, आपण थेट त्यांचंच पद खेचून घेताय?.
ठीक आहे मी गुन्हेगार आहे, मला मान्यय. पण मी एवढा मोठा गुन्हेगार नाही. मी माझ्या बापावर चाकूचा वार केलेला नाही, असा पलटवारही आव्हाड यांनी केलाय. आम्ही १९९० सालापासून पाहतोय, साहेब तुमचंच ऐकायचे, आम्ही तर गुप्त बैठकीला नसायचो. मग, तुम्ही का नाही एक ठेवलं घरं, तुम्हा का फोडलं घर? कसं भाषण होतं ते, आपण आपल्या आई-बापाला काय सांगतो? प्रकृती उत्तम राहण्यासाठी आपण त्यांना काम करायला लावतो, असेही आव्हाड यांनी म्हटले.
राष्ट्रवादी पक्ष कोणाचा
ही लढाई टेक्निकल आहे, शिवसेनेच्या याचिकेतून अनेक गोष्टी क्लेअर झाल्या आहेत. पक्ष कोणाचा आहे?, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाच्या मागणीसंदर्भात दिलेल्या उत्तरातून हे स्पष्ट केलंय. विधानसभेतील संख्याबळावर पक्ष ठरत नाही, असं स्वत: सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलंय, असा निकालाचा दाखलाही आव्हाड यांनी बीबीसी मराठीशी यावेळी बोलताना दिला.
आव्हाडांवर अजित पवारांची टीका
आपल्या संघटनेत त्यांनी काही असे लोकं बरोबर घेतले की, ते संघटनेचं वाटोळं करतील. उदाहरण द्यायचं झालं तर तो ठाण्याचा पठ्ठ्या. त्यांच्यामुळे गणेश नाईक आपला पक्ष सोडून गेले, संदीप नाईक आपला पक्ष सोडून गेले, सुभाई भोईर पक्ष सोडून गेले, निरंजन डावखरे पक्ष सोडून गेले, वसंत डावखरे मला म्हणायचे, साहेब का म्हणून ह्याला मोठं करतात, असे म्हणत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला. आपल्यामध्ये जिवाभावाचे कार्यकर्ते असे असले पाहिजे, त्यांनी तिथं नेतृत्त्व केलं पाहिजे. पण, त्याशिवाय तिथे बेरजेचं राजकारण केलं पाहिजे. एकेका मंत्र्यांनी ४-४ आमदार निवडून आणले पाहिजे. मी ह्या ९ जणांना सांगितलंय की, तुम्ही चार-चार निवडून आणा, बाकीचं आम्ही बघतो. पण तिथं तर आपले आमदार घालवणाऱ्यालाच मंत्री केलंय. जसं काही काही पक्षाचे प्रवक्ते बोलून चांगल्याचं वजवाटोळं करतात, त्याचप्रमाणे ती व्यक्ती तिथं वजवाटोळं केल्याशिवाय राहणार नाही, असं माझं ठाम मत आहे, असे म्हणत अजित पवारांनी नाव न घेता एकप्रकारे संजय राऊत यांचा दाखला देत जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलं.
जयंत पाटलांनी भुजबळांना करुन दिली आठवण
छगन भुजबळांना फुले पगडीची आठवण करून देत जयंत पाटील म्हणाले, "पवार साहेब, दोन वर्षांचा तुरुंगवास भोगून पुण्याला त्यांचे आगमण झाले. तेव्हा त्यांच्या डोक्यावर फुले पगडी तुम्ही ठेवली होती, आठवतं का बघा. महात्मा फुल्यांच्या विचारांची ती पगडी त्यांच्या डोक्यावर ठेवली, तेव्हा बडवे आडवे आले नाही. त्या पगडी खालील तुमचा डोक्यातून ज्योतिराव फुलेंचा विचार निघून गेला, तुम्ही त्या डोक्यातला फुल्यांचा विचार काढून टाकला आणि ज्यांनी ज्योतीराव फुले आणि सावित्री बाईंची चेष्टा केली त्यांच्या मांडिला मांडी लाऊन बसायला लागलात, या महाराष्ट्राला तुम्ही काय उत्तर देणार हे सांगा?"