मी कर्ज घेतले नाही, गॅरेंटरही नाही, ‘त्या’ कॉल्समुळे कंटाळलो!, लोन ॲपकडून भाजप नेते आशिष शेलारांची छळवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 05:59 AM2023-09-02T05:59:49+5:302023-09-02T06:00:02+5:30
एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस ठाण्यातील सायबर क्राइम टीमही तक्रारीवर काम करत आहे.
मुंबई : भाजपचे आमदार आशिष शेलार यांना एका अज्ञात व्यक्तीने वारंवार कॉल करत तुम्ही कर्जासाठी जामीनदार असून त्याची परतफेड करा, असे सांगत अनेक मेसेज केले. गेली दोन वर्षे हा प्रकार सुरू असल्याने अखेर त्यांनी वांद्रे पोलिसात धाव घेतली.
शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कोणतीही धमकी देण्यात आली नाही, पण गेल्या दोन आठवड्यांत आलेल्या अनेक कॉल्समुळे मी कंटाळलो होतो. मी कोणतेही कर्ज घेतले नाही किंवा गॅरेंटर घेतला नाही, असे कॉलरला सांगूनही त्याने कॉल्स थांबवले नाही. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी कॉलरवर तोतयागिरी, फसवणूक, गुन्हा करण्याचा प्रयत्न आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली अज्ञात गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस ठाण्यातील सायबर क्राइम टीमही तक्रारीवर काम करत आहे.
‘तो नंबर ट्रॅकिंग मोडवर’
ज्या क्रमांकावरून कॉल आले होते तो नंबर ट्रॅकिंग मोडवर ठेवल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. शेलार यांच्या कार्यालयातील कर्मचारी नवनाथ सातपुते यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. शेलार यांना थकीत कर्जाची रक्कम तत्काळ ७ हजार ७०० रुपये भरण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.