सचिन वाझे यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात आरोपांच्या घेऱ्यात अडकलेले मुंबई पाेलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे यांच्याकडे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या चौकशीत ‘मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडे यांच्याशी काही संबंध नाही’, अशी माहिती वाझेंनी दिल्याचे समजते.
एटीएसची विविध पथके मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी तपास करत आहेत. यापैकी एक पथक वाझे यांच्या मागावर असल्याचे समजते. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझेंच्या अटकेची मागणी केली होती. हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी वाझेंवर पतीच्या हत्येचा संशय व्यक्त करत, वाझेंनी उद्याेगपती अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फाेटकांनी भरलेली स्काॅर्पिओ ३ महिने वापरल्याची माहिती एटीएसला दिली होती.
एटीएसकड़ून वाझे यांची ८ ते १० तास चौकशी करण्यात आली. यावेळी ‘मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही. धनंजय गावडेंशी माझा काहीही संबंध नाही. मी त्यांना ओळखतही नाही, अशी माहिती वाझेंनी एटीएसला दिल्याचे समजते. धनंजय गावडे वसई-विरार पालिकेतील शिवसेनेचे नालासोपारा येथील माजी नगरसेवक आहेत.
दरम्यान, बुधवाऱी वाझे यांनी आपण आपली भूमिका गुरुवारी स्पष्ट करणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. मात्र गुरुवारीही त्यांनी बोलणे टाळले.