Rahul Narvekar ( Marathi News ) : शिवसेनेच्या फुटीनंतर दोन्ही गटांकडून एकमेकांचे आमदार अपात्र करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकांवर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अंतिम निकाल देणार आहेत. मात्र त्यापूर्वीच नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संताप व्यक्त करत गंभीर आरोप केले. या आरोपांवर राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण देत मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागील कारण सांगितलं आहे.
"विधानसभा अध्यक्षांची कोणकोणती कामे असतात, ते कोणत्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, याची कल्पना माजी मुख्यमंत्र्यांना असायला हवी, असं माझं मत आहे. मात्र तरीही ते अशा प्रकारचे आरोप करत असतील तर त्यामागील हेतू काय आहे, हे स्पष्ट होतं. ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिका निकालात काढत असतात, त्यावेळी त्यांनी इतर कोणतीही कामे करू नयेत, असा कोणताही आदेश नाही," असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तसंच विधानसभा अध्यक्ष म्हणून विधिमंडळाच्या बोर्डाची कामे असतात, त्यात मुख्यमंत्रीही सदस्य म्हणून असतात. तसंच माझ्या विधानसभा मतदारसंघातील कामे आणि राज्यातील इतर प्रश्नांसदर्भात राज्याच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांची मला भेट घ्यायची असेल तर त्यासाठी मला कोणाच्या परवानगी गरज आहे, असं मला वाटत नाही, असा टोलाही नार्वेकरांनी लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली? कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीवर भाष्य करताना राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे की, "माझी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक ही ३ जानेवारी रोजी होणार होती. मात्र मी आजारी असल्याने ही बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे तब्येत स्थिरस्थावर झाल्यानंतर मी रविवारी मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आणि विधिमंडळ बोर्डातील काही मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणं आवश्यक असल्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत कुलाबा-नरिमन पॉइंट कनेक्टरच्या कामात एमएमआरडीएकडून होणारी दिरंगाई आणि स्थानिकांचा विरोध विचारात घेऊन ओव्हरहेड ब्रिज न करता अंडरवॉटर टनेल करण्यासंदर्भातील प्रस्ताव मी त्यांच्याकडे मांडला. तसंच दक्षिण मुंबईतील रस्त्यांचं काँक्रिटीकरण, काही ठिकाणांचं सौंदर्यीकरण आणि विधिमंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी कामावर रुजू करून घेणं व रिक्त पदं भरण्यांसदर्भातील चर्चा प्रलंबित होती. ही चर्चा पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली," असा दावा नार्वेकर यांनी केला आहे.
दरम्यान, "आज गोव्यात एका कार्यक्रमासाठी जात असताना माझी विमानतळावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल देसाई आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याशीही भेट झाली. मग ही भेट देखील कोणत्या हेतूने झाली होती का?" असा खोचक सवालही राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
नार्वेकर-शिंदे भेटीवर आरोप करताना उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
आमदार अपात्रतेवर निकाल येण्याआधी झालेल्या राहुल नार्वेकर-एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून आरोप करताना उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, "न्यायमूर्तीच आरोपीला भेटले, असा हा प्रकार आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्यावर आम्ही अपत्रातेचा खटला दाखल केला आहे आणि असं असताना राहुल नार्वेकर दोनदा गुप्तपणे त्यांना जाऊन भेटले आहेत. अशा स्थितीत आम्ही न्यायाची अपेक्षा कशी करावी? ज्या पद्धतीने या केसची हाताळणी सुरू आहे; त्यावरून लोकशाहीचा खून होतोय की काय, अशी चिन्ह दिसत आहेत," असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला होता.