मुंबई - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी माझ्यासाठी राजकारण सोडलं असतं असं वक्तव्य केले होतं, त्यास उत्तर देताना त्यांनी राजकारण सोडले असते की नाही हे माहीत नाही. मात्र, 2009 साली मी निवडणूक लढवावी अशी लोकभावना असतानाही पंकजाताईंसाठी मी आमदारकी सोडली. बहिणीच्या प्रचारावेळी घोषणा देणारा मी पहिला होतो, असे विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
मुंडे यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतील वृत्तांत आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला. गोपीनाथ मुंडेंचे निधन, अपघात की घात? हा मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पडलेला प्रश्न आहे. साहजिकच माझ्या मनातही शंका आहे. सामान्य लोकांना सीबीआयचा अहवाल मान्य नाही. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचे समाधान हे सरकार करणार आहे का? असा प्रश्न विचारत धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडेंच्या उत्तरावरुन प्रश्न उपस्थित केला आहे. दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. जर, मुंडेसाहेबांच्या मृत्युची चौकशी करायची असेल, तर सुरुवात राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून करावी लागले, असे पंकजा यांनी म्हटले होते.
एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना धनंजय मु्ंडेंनी सरकारचे अपयश, मंत्र्यांचे घोटाळे, राज्यातील परिस्थिती, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्युचे प्रकरण, बीडचे राजकारण आणि स्वतःवरील आरोपांना उत्तरे दिली. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकची पार्टी आहे. स्थानिक पातळीवर मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. जनतेचा पाठिंबा आणि विश्वास आमच्या बाजुने आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीलाच अग्रस्थान मिळेल, असा दावाही मुंडेंनी केला. तसेच लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरला असून तो मी नव्हेच, असेही मुंडेंनी सांगितले.