मुंबई: शिवसेनेने 2014मध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाआघाडी करुन सत्तास्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानानंतर विविध प्रतिक्रिया येत आहे. शिवसेनेने काँग्रेसला दिलेल्या प्रस्तावाबाबत मला कल्पना नसल्याचे मत मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी व्यक्त केले आहे.
पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानात तथ्य असू शकतं; भाजपाचा दावा
एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, काँग्रेसला कोणी प्रस्ताव दिला आणि कशासाठी दिला याबाबत मला माहिती नाही. शिवसेनेनं काँग्रेसला दिलेल्या सत्तास्थापनेच्या प्रस्तावाचा जास्त खुलासा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण करु शकतात असं अनिल परब यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी देखील याबाबत बोलताना सांगितले की, पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेनेने २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला प्रस्ताव दिला नव्हता. काँग्रेसबाबत चर्चा झाली असावी. पण आमच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नव्हती हे सत्य आहे असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
शिवसेनेच्या 'त्या' प्रस्तावाबाबत राष्ट्रवादीशी चर्चा नाही; २०१४ मध्येच होणार होती महाविकास आघाडी?
पृथ्वीराज चव्हाण यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये झालेल्या आघाडीबाबत चव्हाण यांनी यावेळप्रमाणेच पाच वर्षांपूर्वीसुद्धा अशा प्रकारचा प्रस्ताव आला होता, असे सांगितले होते. ते म्हणाले की, ''त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील अल्पमतातील सरकार स्थापन झाले होते. तर भाजपाविरोधात निवडणूक लढवलेल्या शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली होती. त्यावेळीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडीचा प्रस्ताव दिला होता. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करून भाजपाला सत्तेतून दूर करावे, असा प्रस्ताव होता. मात्र हा प्रस्ताव मी फेटाळून लावला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते.
भाजपाने मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी केली. एकहाती सत्ता मिळावी व विरोधी पक्ष संपावेत यासाठी भाजपाने प्रयत्न केले. अशा परिस्थिती भाजपाकडे पुन्हा सत्ता गेली असती तर राज्यातील लोकशाही संपुष्टात आली असती. म्हणूनच मी पर्याची सरकारची कल्पना मांडली. तसेच भाजपा आणि शिवसेनेत तीव्र मतभेद झाल्यावर ते प्रत्यक्षात यावे यासाठी पुढाकार घेतला. माझ्या या कल्पनेला सुरुवातीला विरोध झाला. मात्र मी आग्रह कायम ठेवला. सर्व आमदारांशी बोललो. अल्पसंख्याक नेत्यांशी चर्चा केली. भाजपा आपला नंबर एकचा शत्रू आहे आणि त्याला रोखणे गरजेचे आहे हे सर्वांना पटवून दिले, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.