'वडिलोपार्जित शेतीशिवाय माझ्या नावावर काहीही नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 04:10 AM2019-07-03T04:10:44+5:302019-07-03T11:33:34+5:30
'तीन वर्षांत माझ्याकडेही अनेकांच्या फाइल्स जमा झाल्या. पण माझ्यावर आली ती वेळ इतरांवर येऊ नये, म्हणून मी गप्प राहिलो.'
मुंबई : गेल्या चाळीस वर्षांत मी एकही निवडणूक हरलो नाही. राजकीय आयुष्यात कधी भ्रष्टाचाराचे आरोप झाले नव्हते. आताही जे आरोप झाले ते विधानसभेबाहेरच्या व्यक्तीने बिनापुराव्याने केले. शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. सर्व आरोपांची चौकशी करा. कोणी खोटे आरोप करत असेल तर त्यालाही कठोर शिक्षा होईल असा कायदा करा. मला हा डाग घेऊन जायचे नाही, अशी मनातील खदखद भाजप नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधानसभेत बोलून दाखविली.
तीन वर्षांत माझ्याकडेही अनेकांच्या फाइल्स जमा झाल्या. पण माझ्यावर आली ती वेळ इतरांवर येऊ नये, म्हणून मी गप्प राहिलो. विरोधी पक्षनेता असताना मीही आरोप केले. पण समर्थनार्थ मी कागदपत्रे दिली. माझ्यावरील आरोपांमुळे जे भोगलेय त्याच्या वेदना आजही होत आहेत. यापेक्षा अधिक वाईट प्रसंग माझ्या जीवनात येऊ शकत नाही.
दाउदच्या बायकोशी माझे संभाषण होत असल्याचा आरोप झाला. कोणीतरी हॅकर मनीष भंगाळेला पुढे केले. एटीएसपासून सगळयांनी चौकशी केली. पण तथ्य आढळले नाही. माझ्या जावयाची लिमोझीन गाडी असल्याचा आरोप झाला. त्याने ती गाडी घेतली होती २०१२ मध्ये आणि तो माझा जावई झाला २०१३ मध्ये. ती मॉडिफाइड कार होती. ओरिजनल लिमोझीन नव्हतीच, असे खडसे म्हणाले.
‘माझ्या नावे काही नाही’
एमआयडीसीच्या जमिनीचा आरोप झाला. ती एमआयडीसीची नव्हतीच. माझा जमिनीशी संबंधही नव्हता. माझ्या पत्नीने ती घेतली होती. वडिलोपार्जित शेतीशिवाय माझ्या नावावर कोणताही उद्योग नाही. शैक्षणिक संस्था, मेडिकल कॉलेज नाही असेही खडसे म्हणाले.