मुंबई - शिवसेना नेते आणि राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर सातत्याने निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि ४० आमदारांना ते लक्ष्य करत आहेत. बुधवारी रात्री दानवे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, आपण ४० महिशासुरांचे मर्दन करण्याची मागणी देवीपुढे केल्याचं ते म्हणाले होते. यासंदर्भात मंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारला असताा, असे अनेक अंबादास दानवे मी झेपवले आहेत, असे सामंत यांनी सांगितले.
शिवसेनेचं संपर्क अभियान मुंबईत चालू आहे, त्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मला दिली आहे. आज दोन मेळावे झाले दोन्ही मिळावे फार मोठे झाले आहेत. सभा घेणं हा लोकशाहीचा अधिकार आहे, शेवटी कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सभेला येणाऱ्या लोकांची देखील जबाबदारी आहे, असे सामंत यांनी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले. यावेळी, पत्रकारांनी अंबादास दानवेंनी ठाण्यात देवीचं दर्शन घेतल्यानंतर महिशासूर मर्दिनीकडे ४० महिशासुरांचे मर्दन करण्याची प्रार्थना केल्याचे म्हटले. यासंदर्भातील प्रश्नावर सामंत यांनी उत्तर दिले.
मी अनेक अंबादास दानवे झेपवले
मला काही फरक पडत नाही मी असे अनेक अंबादास दानवे झेपवले आहेत. दुसऱ्याचे वाईट व्हावे म्हणून देवीकडे प्रार्थना करणाऱ्या माणसाकडे देव बघत असतो, की हा किती वाईट आहे. देव त्याचेच वाईट करतो, असे प्रत्युत्तर उदय सामंत यांनी अंबादास दानवेंना दिले. तसेच, दानवेंनी त्यांचं विधान परिषदेचे पद जितकी वर्ष आहे ते सांभाळावं, त्यांचे विचार त्यांनी पोहोचवावे. देवी त्यांना चांगली बुद्धी देवो हीच माझी प्रार्थना, असे उपरोधात्मक टोलाही सामंत यांनी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. अतिशय वेगाने ते काम करतात. २२ तारखेला आमची बैठक घेतली आणि २८ तारखेला भारतरत्न लता मंगेशकर यांच्या संकल्पनेतील पंडीत दिनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयासाठी १०० कोटी रुपये मंजूर केले. अडीच वर्षांपूर्वी जी संकल्पना आमच्यासमोर आली, ती संकल्पना एकनाथ शिंदेंनी केवळ २.५ महिन्यात प्रत्यक्षात उतरवली, म्हणूनच बुलेट ट्रेनपेक्षाही त्यांचा फास्ट स्पीड आहे, असे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.
बाळासाहेबांच्या सभेचा भास होतो
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या सभेला जी गर्दी होते, ती स्वर्गीय बाळासाहेबांच्या सभेसारखी असते. म्हणूनच एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय, असा भास होतो, कारण एवढी लाखो लोकांची गर्दी सभांना होत आहे, असे म्हणत सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेची तुलना बाळासाहेबांच्या सभेसोबत केली. तसेच, आदित्य ठाकरेंच्या सभेवर नाव न घेता टिका केली. आमच्याकडे दापोलीला काहीजण सभेसाठी आले होते, एखादा कोपरा पाहायचा, राष्ट्रवादीचे लोकं भगवा झेंडा घेऊन जमवायचे आणि आम्हाला शिव्या द्यायच्या, असे म्हणत सामंत आदित्य ठाकरेंच्या सभेवर टिका केली.
दसरा मेळाव्याला मोठी गर्दी
दसऱ्या संदर्भातील आमची चर्चा व्यवस्थित झाली. दसरा मेळाव्याला मुंबईमधून विक्रमी लोक एकनाथ शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी वंदनीय बाळासाहेबांचे खरे समर्थन करण्यासाठी उपस्थित राहतील. नवीन योजना राबविण्यात येत नाही, हे जुनेच योजना आहे जी राबविण्यात येत आहे. यापूर्वी राबविण्यात आली नव्हती. 75 हजार लोकांना रोजगार मिळेल अशी योजना आहे.