Join us

LMOTY 2018: राज ठाकरेंचे बोलणे मी फारसे मनाला लावून घेतले नाही- अक्षय कुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 9:03 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात अक्षय कुमारवर टीकास्त्र सोडले होते.

मुंबई: विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2018' हा पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची मुलाखत झाली. लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी राजकारणाच्या मुद्द्यावर अक्षयला बोलते केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात अक्षय कुमारवर टीकास्त्र सोडले होते. इतकी वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अक्षय कुमारकडे कॅनडाचे नागरिकत्त्व का आहे, असा सवाल राज यांनी विचारला होता. या पार्श्वभूमीवर ऋषी दर्डा यांनी अक्षय कुमारला काही प्रश्न विचारले. इतकी वर्षे चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर राज ठाकरेंनी तुझ्या कॅनेडियन नागरिकत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा वाईट वाटले नाही का, असे त्यांनी अक्षयला विचारले. तेव्हा अक्षयने म्हटले की, मला बिलकूल वाईट वाटले नाही. मी राज ठाकरेंची टीका फारशी मनाला लावून घेतली नाही. कारण आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीत प्रत्येकालाच हवे ते बोलण्याचा हक्क आहे, असे अक्षयने सांगितले.याशिवाय, तुला एखाद्या पक्षाकडून राजकारणात येण्याची ऑफर मिळाली तर काय करशील, असा प्रश्नही अक्षयला विचारण्यात आला. त्यावर अक्षयने म्हटले की, मी राजकारणात आलो तर त्यासाठी पूर्ण वेळ देता आला पाहिजे. मात्र, सध्या मला चित्रपटांमध्ये काम करायचे आहे. सध्याच्या घडीला मी 'रावडी राठोड-2' किंवा 'सिंग इज किंग' सारख्या व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती करू शकतो. परंतु मला ठोस सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करायची आहे. त्यामुळे तुर्तास तरी राजकारणात जाण्याचा माझा कोणताही विचार नसल्याचे अक्षय कुमारने स्पष्ट केले.  

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८अक्षय कुमारराज ठाकरे