मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला. उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशी नाराजी संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. तसेच घोडेबाजार होऊ नये, यासाठी मी राज्यसभेची निवडणूक लढवणार, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तसेची ही माझी माघार नसून माझा स्वाभिमान असल्याचंही संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं.
शिवसेनेनं माझ्यासमोर पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवली होती. तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा, आम्ही उद्या लगेच तुमचं नाव जाहीर करु, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं. शिवसेनेबद्दल माझ्या मनात द्वेष नाही. पण मला कोणत्याही बंधनात अडकायचं नाही, असं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे.
राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याने मी मोकळा झालो आहे. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. माझ्यासाठी खासदारकी महत्त्वाची नाही. माझ्यासाठी जनता महत्त्वाची आहे. स्वाभिमानाने आणि सन्मानाने राहणारं माझं व्यक्तिमत्व आहे. मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य संघटना पुढे कार्यरत ठेवणार आहे. स्वराज्य संघटना मजबूत करणार आहे. राज्यभरात दौरे करून संघटनेला उभारी देणार आहे. मला माझी ताकद ४२ आमदार नाही तर जनता आहे असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विधानसभेच्या २८८ सदस्यांमधून राज्यसभेत निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला; छत्रपती संभाजीराजे यांचा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला- संभाजीराजे
मी अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढवणार होतो. मला कुठल्याही पक्षाचा द्वेष नाही. मला सगळी गणिती माहिती होती. पुढचा प्रवास खडतर होता याची जाणीव होती. मला शिवसेना खासदारांचे फोन आले. ओबेरॉयमध्ये आमची बैठक झाली. शिवसेनेत प्रवेश करावा अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे असं त्यांनी सांगितले. परंतु मी शिवसेनेत प्रवेश करू शकत नाही हे स्पष्टपणे सांगितले.
मुख्यमंत्र्यांना भेटायला वर्षावर गेलो. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. परंतु मी शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचा अपक्ष उमेदवार म्हणून मला पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव दिला. त्यावर सगळं काही ठरलं. ड्राफ्ट फायनल झाला. त्यानंतर मी कोल्हापूरला जायला निघालो तेव्हा संजय पवारांना उमेदवारी दिल्याचं कळालं. सगळ्या अपक्ष आमदारांवर दबाव होता. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला असा गौप्यस्फोट संभाजीराजे यांनी केला.