Join us

एचडीआयएलला दिलेल्या कर्जाबद्दल मला काहीही माहिती नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 3:37 AM

पीएमसी बँकेच्या निलंबित व्यवस्थापकीय संचालकांची माहिती

मुंबई : पीएमसी बँकेतून एचडीआयएलला दिलेल्या कर्जाबद्दल मला कोणतीच माहिती दिली गेली नाही. बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळातील काही व्यक्तींनी एचडीआयएलला दिलेल्या कर्जवाटपाच्या प्रक्रियेत सहा वर्षांपूर्वीच तांत्रिक फेरफार केल्यामुळे आरबीआयला याबद्दल खरी माहिती मिळाली नाही, असे पीएमसी बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी संगितले.मुंबईत शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बँकेने खातेदारांची फसवणूक केली नसून, काही तांत्रिक गोष्टींमुळे आज बँकेवर आणि खातेदारांवर अशी परिस्थिती ओढावली आहे. बँकेने या परिस्थितीवर मात केली असती, परंतु आरबीआयने घातलेल्या निर्बंधामुळे खातेदारांवर वाईट परिस्थिती ओढावली आहे. आरबीआयने घेतलेला निर्णय अत्यंत कठोर असून, तो बँक व खातेदारांवर अन्याय करणारा आहे, असे जॉय यांनी सांगितले.घाबरू नका; ठेवी परत करण्याएवढा पैसा शिल्लकजॉय थॉमस खातेदारांना दिलासा देताना ते म्हणाले की, खातेदारांनी घाबरून जाऊ नये. सर्व खातेदारांच्या ठेवी परत करण्याएवढा पैसा पीएमसी बँकेकडे शिल्लक आहे. केवळ आरबीआयने घातलेल्या निर्बंधामुळे आम्ही पैसे देऊ शकत नाही. खातेदारांना रोख स्वरुपात पैसे द्यावे लागत असल्याने सर्व शाखांवर पैसे पोहोचवण्यास उशीर होत आहे. सुरुवातीला हजार त्यानंतर दहा हजार व लवकरच खातेदारांना एक लाख रुपये काढता यावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. खातेदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आम्ही लवकरच या परिस्थितीवर मात करू व सर्व ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करू.दरम्यान, पीएमसी बँकेतील खातेधारकांसाठी लवकरच न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे मुंबईतील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :पीएमसी बँक