'त्या' मुलीची अन् माझी ओळख नाही पण; विक्रम गोखलेंनी पुन्हा ठामपणे सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 12:09 PM2021-11-19T12:09:00+5:302021-11-19T12:10:01+5:30
मराठी माणूस आज भरडला जात आहे. सध्याचे सरकार हे चुकलेले गणित आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी महाआघाडी सरकारवर केली होती
पुणे - ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पुण्यात कंगनाच्या विधानाचं समर्थन केल्यानंतर सोशल मीडियातून त्यांना जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. तसेच, गोखले यांनी राजकीय भूमिकांवरही भाष्य केल्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांच्यावर टीका केली. कंगना रणौतच्या विधानाचं समर्थन केल्यानंतर उठलेल्या वादळी टीकेनंतर विक्रम गोखलेंनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा आपलं मांडलं आहे. यावेळीही, आपण आपल्या मतावर ठाम असल्याचं ते म्हणाले.
मराठी माणूस आज भरडला जात आहे. सध्याचे सरकार हे चुकलेले गणित आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी महाआघाडी सरकारवर केली होती. हे गणित सुधारण्याची अजूनही वेळ गेलेली नाही. देश संकटाच्या उंबरठ्यावर असताना भाजप व शिवसेनेने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. तसेच, कंगनाने देशाच्या स्वातंत्रतेबद्दल केलेल्या विधानाचेही त्यांनी समर्थन केलं आहे. त्यानंतर, सोशल मीडियातून आणि राज्यभरातून त्यांना ट्रोल करण्यात आलं. त्यावर, गोखलेंनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.
कंगना रणौत या मुलीने गेल्या दोन वर्षात जी काही भाष्य केली आहेत, ती तिची वैयक्तिक मतं आहेत. भारतीय स्वातंत्र्याबद्दल तिने केलेल्या वक्तव्याला तिची स्वतःची काही कारणं असू शकतात. मात्र, मी तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला यात माझीही काही कारणं असू शकतात, ती समजून न घेताच याबाबत धुरळा उडवायला सुरुवात झाल्याचं विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे, त्या मुलीची आणि माझी ओळख नाही. आम्ही कधी एकत्र कामही केलेलं नाही. परंतु, तरीही कुणीतरी काहीतरी बोलतंय त्याची दखल घेणं, आपलं मत असेल आणि आवश्यकता असेल तर ते मत व्यक्त करणं हा अधिकार आहे.
माझी कंगनाशी ओळख नाही, पण...
माझी तिच्याशी ओळख नसली, तरी माझ्या राजकीय अभ्यासाशी चांगली ओळख आहे. मी जो दुजोरा दिला, त्यामागे माझीही काही कारणं आहेत, आता ती सांगत बसत नाही. पण, १८ मे २०१४ रोजीचा गार्डियनचा अंक आहे. जे गार्डियनने म्हटलंय, तेच कंगनाने म्हटलंय, त्याची कॉपीही माझ्याकडे आहे. त्यामुळे कंगना काहीही चुकीची बोलली नाही असं मी म्हणालो.. ताबडतोब बोंबाबोंब... सुरू झाल्याचं ते म्हणाले.
मी स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला नाही
भारतीय नागरिक म्हणून आणि राजकीय अभ्यासक म्हणून हा माझा अभ्यास आहे. सन २०१४ पासून माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला खरं स्वातंत्र्य मिळालं, हे माझं प्रामाणिक मत असून ते मी मुळीच बदलणार नाही, असेही गोखलेंनी स्पष्टपणे सांगितलं. ज्यांना मी काय बोललोय माझ्या मूळ भाषणात, जे तुम्ही दाखवलंच नाही, अश्रू ढाळणारे स्वातंत्र्यसैनिक ज्यांचे शिव्या-शाप मला मिळताहेत, त्यांना कळेल विक्रम गोखले काय बोलले आणि काय दाखवलं. मी कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकाचा अपमान केलेला नाही, असेही विक्रम गोखलेंनी म्हटलं आहे.