मुंबई - मराठी ही आपली मातृभाषा आहे, याबद्दल आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. मराठी बोलताना, वाचताना, लिहताना आपण भाषेवरील प्रेम नेहमीच व्यक्त करतो. मात्र, अनेकवेळा महाराष्ट्रात राहूनच मराठीचा हेतूपरस्पर अपमान केला जातो. मुंबईतील बोरीवली मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांनी एअरटेल गॅलरीतील एका कर्मचाऱ्यास अशाच मराठीद्वेषाबद्दल चांगलाच धडा शिकवला. मनसचे सरचिटणीस नयन कदम यांनी यासंदर्भातील व्हिडिओ आणि घडलेला प्रसंग आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
मुंबईत अनेकदा परप्रांतीय नागरिकांकडून मराठी बोलण्यास नकार दिला जातो. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई लाखो अमराठी नागरिकांचं घर चावलते. त्यामुळे, अनेकांनी मराठी भाषा शिकून येथील संस्कृती जपलीय. पण, काहीजण मराठी बोलण्यास जाणीवपूर्वक नकार देतात. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या अमराठींना मराठीचा धडा शिकवला जातो. मराठी भाषेसाठी मनसेचा नेहमीच आग्रह असतो, महाराष्ट्रात आमची मराठी हि प्रत्येकाला आलीच पाहिजे. महाराष्ट्रात राहून "मला मराठी बोलता येत नाही" तुम्ही हिंदीत बोला हे चालणार नाही. दुकानांचे बोर्ड मराठी केले. त्यात काम करणाऱ्यांना मराठी यायलाच हवी, असे मनसे ठणकावून सांगते.
बोरीवली येथील एयरटेल कंपनीच्या गॅलरीमध्ये एक मराठी युवक आपल्या मोबाइलचे रिचार्ज करण्यासाठी गेला. त्याला रु. २४९/- चा रिचार्ज करायचा होता, त्यासाठी त्याने रु. ५००/- एरटेल कर्मचाऱ्याला देऊ केले आणि परतीचे रु. २५१/- अपेक्षित होते. परंतु एयरटेल कर्मचाऱ्याने १ रुपया कमी देऊन फक्त रु. २५०/- दिले. सदर युवकाने अयोग्य रक्कम परत मिळाल्याने विचारणा केल्यावर एयरटेल कर्मचाऱ्याने अगदी तुसड्या भावाने त्याचे परतीचे पैसे देणे नाकारले आणि वरून "मला मराठी येत नाही तू हिंदीत बोल" अशी मागणी केली व त्याने आपल्या सहकर्मचाऱ्यांसोबत त्या युवकासोबत वाद घातला. त्या एयरटेल गॅलरीमध्ये ५-६ कर्मचारी असूनसुद्धा त्यातून एकालाही मराठी येत नव्हते.
सदर युवकाने यासंदर्भात मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांना फोन करून तक्रार सांगितली. त्यानंतर, कदम यांनी बोरिवली विधानसभेतील मनसैनिकांना तातडीने चारकोप येथील एयरटेल गॅलरीमध्ये त्या युवकासोबत पाठवले. तिथल्या कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला असे काहीही न घडल्याचे सांगितले. अखेर, मनसेच्या स्टाईलनंतर सर्व गोष्टी कबूल केल्या व माफी मागितली. तिथल्या कर्मचाऱ्याने सरतेशेवटी सर्व कर्मचारी मराठीत बोलतील व त्यांना मराठी भाषा शिकवण्यात येईल ह्याचे आश्वासन दिल्याचे कदम यांनी म्हटले आहे. मात्र, स्थानिक पोलिसांनी यासंदर्भात एअरटेल कर्मचाऱ्याऐवजी मराठी युवकालाच दम दिल्याचा आरोपही कदम यांनी केला आहे.