लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मी सहा, सात वर्षांपूर्वी केवळ एकदाच भेटलो हाेताे. ते माझे मित्र नाहीत की त्यांच्याशी माझा फारसा परिचयही नाही, त्यामुळे त्यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही, असे भाजपचे नेते व माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शनिवारी स्पष्ट केले.
धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार करणाऱ्या तरुणीने आपल्यालाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता, अशी तक्रार हेगडे यांनी गुरुवारी डी.एन. नगर पोलीस ठाण्यात दिली. तर मनसे नेते मनीष धुरी यांनीही संबंधित तरुणीने आपल्यालाही जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप केला. त्यानंतर संबंधित तरुणीने हेगडे व धुरी हे मुंडे यांचे मित्र असल्याने माझ्यावर खोटे आरोप करून त्यांना मदत करत असल्याचा आरोप केला आहे.
मात्र, कृष्णा हेगडे यांनी हा आरोप फेटाळून लावला. त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, माझी मुंडे यांच्याशी नीट ओळखही नाही. २०१४ पूर्वी नागपूरमध्ये त्यांना एकदाच भेटलो होतो. त्यानंतर त्यांच्याशी कधीही संबंध आला नाही. त्यांच्याविरुद्ध तक्रार दिलेल्या तरुणीने आपल्यालाही मेसेज पाठवून अडकविण्याचा प्रयत्न केला होता, ही वस्तुस्थिती सर्वांसमोर यावी, पोलिसांनी सर्व बाजूंनी सखोल चौकशी करावी, यासाठी मी स्वतःहून तक्रार दिली आहे. सदर तरुणी माझ्याबद्दल आदर असल्याचे म्हणत असली तरी माझा त्यांना लांबूनच नमस्कार आहे, असे त्यांनी सांगितले. मुंडे यांच्याविरुद्धची तक्रार पोलिसांच्या तपासाधीन असल्याने त्यावर मी काही बोलणार नाही. मात्र माझ्या मते हे राज्यातील पहिले राजकीय ‘मी टू’ प्रकरण असल्याचा दावा त्यांनी केला.
.................................