Join us

तावडे नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही : सचिन वाझे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:07 AM

मुंबई : संशयास्पद मृत्यू पावलेल्या व्यापारी मनसुख हिरेन यांना फोन करून बोलावलेल्या तावडे नावाच्या व्यक्तीला आपण ओळखत नाही, ...

मुंबई : संशयास्पद मृत्यू पावलेल्या व्यापारी मनसुख हिरेन यांना फोन करून बोलावलेल्या तावडे नावाच्या व्यक्तीला आपण ओळखत नाही, त्याच्याशी आपला कसलाही संबंध नाही, तपासाच्या अनुषंगाने हिरेन यांच्याकडे आपण चौकशी करत होतो, असे मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेतील सहायक निरीक्षक सचिन वाझे यांनी स्पष्ट केले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कार्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा शुक्रवारी मुंब्रातील रेतीबंदर येथील खाडीत आढळून आला होता. त्यांची स्कार्पिओ चोरून आरोपींनी त्यामध्ये जिलेटिन ठेवून ती उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराच्या परिसरात ठेवली होती. त्यामध्ये हिरेन यांना चौकशीसाठी वारंवार पाचारण केले जात होते, त्यामुळे ते वैतागून गेले होते. त्यामध्ये पोलिसाबरोबरच प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींचाही समावेश होता. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन आपल्याला होणार त्रास थांबविण्याबद्दल विनंती केली होती.

याबाबत हिरेन याचे कुटुंबीय आणि विरोधी पक्षांनी सहायक निरीक्षण वाझे यांच्यावर आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझे यांचे गेल्यावर्षी जूनमध्ये हिरेन यांच्याशी संभाषण झाले होते. कार चोरीला गेल्यानंतर ते क्रॉफर्ड मार्केट येथे कोणाला भेटायला गेले होते, हे प्रश्न उपस्थित केले होते. त्याबद्दल वाझे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी विरोधी पक्षाच्या आरोपाबाबत काहीही सांगण्यास नकार दिला. मात्र, तावडे नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. स्फोटकाच्या कारचा तपास सहायक आयुक्त नितीन हालकरे यांच्याकडे होता, त्यांना आपण सहकार्य करीत होतो, असे स्पष्ट केले.