मुंबई - गेल्या चार दिवसांपासून रखडलेले राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज होणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र ही चर्चा सुरू असतानाच आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेला धक्का बसला असून, सत्तारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सत्तारांच्या राजीनाम्याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे म्हटले आहे. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सत्तारांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ''जर कुणी मंत्र्याने राजीनामा देणार असेल तर तो मुख्यमंत्र्यांकडे दिला जातो. त्यामुळे जर अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला असेल तर त्याबाबत मुख्यमंत्र्यांनाचा अधिक माहिती असेल. तसेच अद्बुल सत्तार हे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ते का नाराज आहेत, हे मला माहिती नाही.अब्दुल सत्तार यांनी नेमका का राजीनामा दिला याची माहिती मला नाही, असे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
सत्तार हे राज्यमंत्रीपद मिळाल्याने नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्याबाबत विचारणा केली असता. मंत्रिमंडळातील कुठलेही खाते दुय्यम मानणे हा जनतेचा अपमान आहे, असा सल्ला राऊत यांनी दिला आहे. तसेच नव्यावे शपथबद्ध झालेल्या मंत्र्यांमधील रखडलेल्या खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच अधिक माहिती देऊ शकतील, असेही राऊत यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली होती. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे दाखल झाले आहेत. अब्दुल सत्तार हे आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोड मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी सत्तार यांना अपेक्षा होती. त्यानुसार शिवसेनेने सत्तार यांना राज्यमंत्रिपद दिले. तर औरंगाबादमधून पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. मात्र कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने सत्तार नाराज झाले. अखेर आज त्यांनी खातेवाटप जाहीर होण्यापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला.