Join us

मी प्यायलोय, म्हणत फेकला पेव्हर ब्लॉक! बांगुरनगर पोलिसांवर हल्ला, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 1:02 PM

मद्यप्राशन करून आपापसात वाद घालत राडा घालणाऱ्या तिघांना बांगुरनगर पोलिस पथकाने रोखले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मद्यप्राशन करून आपापसात वाद घालत राडा घालणाऱ्या तिघांना बांगुरनगर पोलिस पथकाने रोखले. यावेळी नशेतील एकाने पोलिस पथकावर  पेव्हर ब्लॉक फेकला तर एकाने शिपायाच्या कानावर ठोसा लगावत त्यांना जखमी केले. मी प्यायलोय, काय करणार तुम्ही?, असे म्हणत पोलिसांवर पेव्हर ब्लॉक फेकला. महिनाभरात याच पोलिस ठाण्याच्या पथकावर हा दुसरा हल्ला आहे.

सुमित तायडे (२५), करण बच्छाव (२४) आणि सुशांत शेट्टी (२५) या तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार नितीन दळवी (३३) हे बांगुरनगर पोलिस ठाण्यात गुन्हे अन्वेषण पथकात कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार, १७ ऑगस्ट रोजी सदर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सरोळकर, हवालदार भोसले आणि शिपाई चव्हाण यांच्यासोबत गस्त घालत होते. 

पहाटे ४ च्या सुमारास ते भगतसिंगनगर नाका २ या ठिकाणी पोहोचले. तेव्हा त्यांना एक ग्रे रंगाची कार उभी दिसली. कारमध्ये काही तरुण बसलेले तर अन्य तिघे बाजूला उभे होते. ते आपापसात भांडत असल्याने पोलिस पथक त्यांच्याजवळ गेले. तेव्हा ते तिघे नशेत होते. पोलिसांनी त्यांना का गोंधळ घालताय असे विचारले. मी प्यायलोय, काय करणार, असे म्हणत पोलिसांशी वाद घालू लागला. त्याचवेळी दळवी यांच्या डाव्या कानावर तायडे याने ठोसा लगावला. त्याचवेळी तायडेने दोन पेव्हर ब्लॉक उचलत भोसले तसेच चव्हाण यांच्या दिशेने भिरकावले. मात्र ते बाजूला झाल्याने थोडक्यात बचावले. यावेळी काही जणांनी तेथून पळ काढला. मात्र, पोलिसांनी प्रतिकार केला असता तायडे हा खाली पडल्याने जखमी झाला. त्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टपली मारून जावे

आमच्या पथकावर झालेल्या हल्ल्यात पोलिसाचा जीव गेला असता.  गेल्या महिन्यातही चिंचोली बंदर परिसरात कारवाई करताना आमच्या कर्मचाऱ्याला आरोपी चावला होता.  कोणीही यावे आणि टपली मारून जावे, अशीच परिस्थिती आहे.

आरोपींना नोटीस

आम्ही आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ३३६, ३४, ३५३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. यातील बच्छाव हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.  ( पोलीस अधिकारी - बांगुरनगर पोलिस ठाणे)

 

टॅग्स :गुन्हेगारी