"मूर्ख लोकांचं ऐकू नका; नागरिकांनी वेळेच्या अटी न पाळता लोकलने प्रवास करावा"- मनसे
By मुकेश चव्हाण | Published: January 29, 2021 07:11 PM2021-01-29T19:11:19+5:302021-01-29T19:14:59+5:30
सरकारने कोणतीही अटी न घालता लोकल सेवा सुरु करावी, अशी माझी अपेक्षा होती, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.
मुंबई: कोरोनाच्या परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरू होती. मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय लोकल सेवा सुरु करण्याचे आदेश आज(शुक्रवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते.
मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू होत आहे. याबाबतची घोषणा आज राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. पण मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. सर्व सामान्य प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत प्रवास करता येणार नाही, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाची रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सरकारने कोणतीही अटी न घालता लोकल सेवा सुरु करावी, अशी माझी अपेक्षा होती, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. मात्र सरकारने बंधन टाकून लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता लोकांची सहनशक्ती संपलेली आहे. त्यांनी मूर्ख लोकांचं ऐकू नये. तसेच नागरिकांनी लोकलच्या वेळेच्या अटी न पाळता लोकलने प्रवास करावा, असं संदीप देशपांडे म्हणाले. तसेच सरकारने याआधीच लोकल चालू करायला हवी होती. मात्र सरकारने सुरु केली नाही, याची खंत असल्याचे मत देखील संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.
मर्यादित काळासाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय दिशाहीन, हास्यास्पद- भाजपा
मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी सूरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी हा निर्णय केवळ धूळफेक असून सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत लोकलची खरी आवश्यकता असते. केवळ रात्री व दुपारी प्रवासाची मुभा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत हास्यास्पद व निरर्थक आहे," असं भाजपाचे नेते अतुल भातखळकर म्हणाले.
महाराष्ट्रात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढला
राज्यातील ठाकरे सरकारनं लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २८ फेब्रुवारी पर्यंत राज्यात आता लॉकडाऊन लागू राहणार आहे. अनलॉक अंतर्गत ज्या गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे त्या गोष्टी सुरूच राहणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. तसंच लॉकडाऊन संबंधीच्या यापूर्वीच्या मार्गदर्शक सूचना २८ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहेत.
लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असून यापूर्वी सरकारनं वेळोवेळी जारी केलेले आदेश लागू असणार आहेत. यापूर्वी ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथिल करण्यात आले होते. यानुसार देण्यात आलेली सूट ही कायम राहणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक. सामाजिक अंतर राखणं गरजेचं, सतत हात धुणे आवश्यक असल्याच्या सूचनाही सरकारकडू देण्यात आल्या आहेत.
Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown.#MissionBeginAgainpic.twitter.com/ehsM0rN9Y0
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 29, 2021
उपहारगृहे व दुकानांसाठी वेळा
मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.