मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असे दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी भाजपासोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र, शरद पवारांनी या निर्णयाला आपला पाठिंबा नसल्याचे सांगत थेट अजित पवारांना चॅलेंज दिलं आहे. त्यासाठी, शरद पवार जनतेत उतरले असून आज येवल्यात ते सभा घेत आहेत. दुसरीकडे रोहित पवार यांनी शरद पवारांसोबत राहणे पसंत केले असून अजित पवारांची आपल्याला काळजी वाटत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
शरद पवार यांची आज येवल्यात सभा होत आहे. त्यासाठी, राष्ट्रवादीतील अनेक नेते शरद पवारांसोबत आहेत. त्यातच, नातू रोहित पवार हेही अजित पवार गटातील नेत्यांवर तोफ डागताना दिसत आहेत. रोहित यांनी आज मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करत त्यांना छत्रपती शाहू महाराजांची आठवण करुन दिलीय. तर, माध्यमांशी बोलताना पुतण्या म्हणून आपणास भीती वाटत असल्याचे सांगत अजित काकांबद्दल काळजीही व्यक्त केलीय.
पुतण्या म्हणून मला एक भीती वाटते. शरद पवारांनंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोण पोहोचलं असेल तर ते अजित दादा गेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये अजित काकासुद्धा लोकनेता आहे. पण, भाजपची अशी प्रवृत्ती आहे, ते बाहेरच्या लोकनेत्याला जवळ करतात आणि संपवतात. तसंच, आपल्या पार्टीच्या लोकांनासुद्धा ते संपवतात. भीती एवढीच वाटते की, अजित काकांचं कर्तृत्व कामाच्या बाबतीत आणि प्रशासनातील जो वचक आहे ते चांगलं असताना भाजपासोबत गेल्यामुळे एकतर विचार संपला. तसेच, त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धोका असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलंय.
हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
धर्मांध महाशक्तीने यंत्रणांचा वापर करत त्रास देऊनही मंत्री हसन मुश्रीफ याच शक्तीच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने कोल्हापूरकर व शाहू महाराजांचा वैचारिक वारसा विसरलेत या शब्दात आमदार रोहित पवार यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली. मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जात होते. मात्र, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी सत्ताधारी भाजपबरोबर हातमिळवणी करत मंत्रिमंडळात शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शरद पवार यांच्यामुळे मुश्रीफांना काय- काय मिळाले याचा लेखाजोखाच मांडला.