मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्ह्यातील विस्कटलेली ‘घडी’ पूर्ववत करण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर होत आहे. जिल्ह्यातील सहापैकी बीड, माजलगाव, परळी, केज आणि गेवराई या पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे घोषित करून पवारांनी त्यांना कामाला लावले. आष्टीमध्ये त्यांना एकही उमेदवार जाहीर करण्यासारखा मिळाला नाही. याबाबत पंकजा मुंडेंनी आपले मत व्यक्त केले आहे. तसेच, मला आगामी निवडणुकांची अजिबात धास्ती नसून आमच्या विरोधकांनीच त्याची धास्ती घेतल्याचं दिसून येतंय, असे पंकजा यांनी म्हटले आहे.
शरद पवारांना साथ देणारा जिल्हा म्हणून तशी बीड जिल्ह्याची ओळख. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी स्थापन केलेल्या काँग्रेस (एस) ला १९८० च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भरभरून यश मिळाले. सातपैकी बीड, माजलगाव, गेवराई, चौसाळा आणि केजमध्ये पवारांच्या पक्षाने बाजी मारली. आष्टीमध्ये अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे तर रेणापूर मतदारसंघात भाजपाचे गोपीनाथ मुंडे विजयी झाले होते. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्यारितीने जिल्ह्यात वाढवलं. राष्ट्रवादीने जिल्ह्यात सत्ता मिळवली होती, पण गेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा सगळीकडेच पराभव झाल्याचे पंकजा यांनी म्हटले आहे. पवार यांनी बीड जिल्ह्यातील विधानसभा उमेदवारांची घोषणा केली, यावर बोलताना पवारसाहेबांचा बीडवर अधिक प्रेम राहिलंय, असा उपरोधात्मक टोलाही पंकजा यांनी लगावला.
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये परळीतील लढत ही रोमांच वाढवणारी आहे. तर, जिल्ह्यातील इतर मतदारसंघांच्या निवडणुका आमच्यासाठी चॅलेंज आहेत. पण, मला वाईट वाटतं, त्यांना म्हणजे मेन कॅप्टनला येऊन तिंथं थांबायला लागतं, असे म्हणत बीडमधील उमेदवारांच्या घोषणेनंतर पंकजा यांनी शरद पवारांवर टीपण्णी केली. तसेच, जिल्ह्यातील नेतृत्वावर तेवढा विश्वास राहिला नसल्याचंही पंकजा यांनी म्हटले. राष्ट्रवादी हा बीड जिल्ह्यात ताकदवर पक्ष होता, तो शुन्यावर आलाय. त्यामुळे आता, जिल्ह्यातील नेतृत्वावर सगळा कारभार सोडता येणार नाही. तसेच, जिल्ह्यातील कोण कधी भाजपात प्रवेश करेल ? याची धास्तीही राष्ट्रवादीने घेतलीय.
मी परळीत निवडूण आलेली आमदार आहे, मला कुठेही धास्ती वाटायंच काम नाही. लोकसभा निवडणुकांवेळी राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला असून माझ्या विधानसभा मतदारसंघातही ते मायनसमध्ये आहेत. त्यामुले धास्ती मला नाही, तर त्यांनाच वाटल्याची दिसून येतंय. कारण, ज्या पद्दतीने ते कामाला लागले आहेत, त्यावरुन ते स्पष्टच दिसतंय, असेही पंकजा यांनी म्हटलं आहे.