मोलाचे पैलू पाडणाऱ्या शिक्षकांमुळेच ‘मी’ घडलो!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 03:04 AM2020-09-05T03:04:31+5:302020-09-05T03:04:48+5:30
ठोंबरे सरांकडून मी इतिहास शिकलो.‘पूर्व दिव्य ज्यांचे रम्य, त्यांना भावी काळ’ हे शिकता शिकता आत्मविश्वासात वाढ होत गेली.
मुंबई : माणूस हा जरी अत्यंत बुद्धिमान असला तरीही दुसºया कोणीतरी एखादी गोष्ट शिकविल्याशिवाय तो ती शिकत नाही. माणसाला जी भाषा शिकवावी ती तो आत्मसात करतो. अनुभवांवरून शिकत जातो. आयुष्यात आलेल्या प्रत्येक शिक्षकामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळे वळण येत गेले, असे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सांगतात.
आत्मविश्वासात वाढ होत गेली
ठोंबरे सरांकडून मी इतिहास शिकलो.‘पूर्व दिव्य ज्यांचे रम्य, त्यांना भावी काळ’ हे शिकता शिकता आत्मविश्वासात वाढ होत गेली.
आई पहिली गुरू
मी लहान असताना मराठी महिन्यांची नावे, आठवड्याचे वार, नक्षत्रांची नावे, अनेक मराठी श्लोक, पाढे हे मी माझ्या आईपासून शिकलो. थोडा मोठा झाल्यावर संस्कृत व्याकरण, काव्य, अनेक छंद माझे वडील पंडित नारायणशास्त्री दीक्षित ह्यांच्याकडून शिकण्याची सुसंधी मला प्राप्त झाली. वडील पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमधे शिक्षक असल्याने अन्य विषयांचे शिक्षकही त्यांचे सहकारी होते. ज्यांना ते प्रेमाने ‘सुहृद्य समाज’ म्हणत असत.
...आणि मी आयपीएस झालो!
जे. एन. यू. म्हणजे ज्ञानाचे अखंड वाहणारे कारंजे होते. तेथील गुरूंमुळे भारत व अन्य देश ह्यांच्या व्यवहारातील कायदेशीर बाबी लक्षात आल्या. दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक पिलाई यांनी एम.ए.च्या दुसºया वर्षाला असतानाच यू.पी.एस.सी.च्या स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले. जे एन.यू.चे ग्रंथालय, प्राध्यापक व खासदार एम. एल. सोंधी यांची व्याख्याने, सप्रु हाउस ग्रंथालय यामुळे पहिल्याच प्रयत्नात मी आय.पी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण झालो.
आयुष्याला कलाटणी मिळाली
शाळेशिवाय वसंत व्याख्यानमालेतील एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, श्री. ग. प्र. प्रधान ह्यांची वेळोवळी होणारी भाषणे राजकीय व सामाजिक प्रगल्भता वाढवीत होती. फर्ग्युसन कॉलेजमधे शिकत असताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पुणे विद्यापीठात डॉ. देवदत्त दाभोळकर हे कुलगुरू असताना चर्चासत्रांना हजर राहण्याची संधी प्राप्त झाली. बी.ए.चा निकाल वेळेवर लागणार नाही हे कळल्यावर ‘तुझा निकाल मी गुप्त तारेने जे एन.यू. नवी दिल्ली येथील स्कूल आॅफ इंटरनॅशनल स्टडिज्चे डीन डॉ. आगवानी यांना कळवतो,’ या आश्वासनामुळे आयुष्याला कलाटणी मिळाली.
अनेकांचे बहुमोल
मार्गदर्शन मिळाले
पुढे हैदराबाद येथील पोलीस अकॅडमीपासून आतापर्यंतच्या प्रवासात अनेकांच्या अनेक थरांवरील मार्गदर्शनामुळे सहायक पोलीस अधीक्षकापासून पोलीस महासंचालक ह्या सर्वोच्च पदापर्यंतची शिडी मी सहज चढू शकलो, असे ते आवर्जून सांगतात.