मलाही सकाळपासून दोनदा धमकी आली; पण मी घाबरणार नाही, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 12:12 PM2023-02-11T12:12:27+5:302023-02-11T12:12:57+5:30
शशिकांत वारीसे यांच्या खुनामागचे खरे सूत्रधार शोधले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आवाज उठवत राहणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.
मुंबई- प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन प्रकरण तापण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प होणारच अशी घोषणा केली होती. त्यानंतर एका पत्राकराचा अपघातात संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीसे यांनी केलेल्या बातमीचा राग मनात ठेवून त्यांच्या दुचाकीला धडक देवून त्यांची हत्या झाल्याच्या घटनेचा रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुकनिदर्शने करुन निषेध केला. हत्येला दोषी असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला कडक शिक्षा करा अश्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. यावेळी शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.
ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी देखील आता या अपघाती मृत्य प्रकरणावर भाष्य केलं आहे. जोपर्यंत शशिकांत वारीसे यांच्या खुनामागचे खरे सूत्रधार शोधले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आवाज उठवत राहणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. या हत्येचा संबंध कोकणात मागील २५ वर्षात झालेल्या हत्येशी जोडत असल्याचे संजय राऊत म्हणाले. आरोपींनी आतापर्यंत किती सुपाऱ्या घेतल्या. कुणाच्या हत्या केल्या हेदेखील शोधलं पाहिजे, असा मुद्दाही संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला.
रिफानरीच्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यातून शशिकांत वारीसे यांची हत्या झाली असल्याचे संजय राऊत म्हणाले. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रकल्पाच्या आसपास जमीनी विकत घेतल्या आहेत. हे कोण व्यापारी आहेत याची यादीच जाहीर करणार असल्याचा इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी दिला. मला पण सकाळपासून दोनदा धमकी आली आहे की वारीसेंचा मुद्दा उचलाल तर तुमचाही वारीसे करू. पण एका पत्रकाराची हत्या ही एका सैनिकाची हत्या असल्याचं सांगत मी हा मुद्दा मांडणारच, मी कुणाला भीत नाही, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, शशिकांत वारिसे सोमवारी नेहमीप्रमाणे कामानिमित्त राजापूरला गेले होते...अचानक त्यांच्या घरच्यांना त्यांचा अपघाताबाबत फोन आला. शशिकांत वारिसे राजापूर इथल्या पेट्रोलपंपावर आपल्या दुचाकीवर होते. यावेळी त्यांना वेगानं आलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याच्या थार गाडीची जोराची धडक बसली. त्यानंतर मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा कोल्हापूर इथं मृत्यू झाला.
काय होती ती बातमी?
पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो अशा आशयाच्या बातमीचं कात्रण वारीसे यांनी शेअर केलं होतं. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या बॅनरसंदर्भात ही बातमी होती. या बातमीचं कात्रणत्यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये टाकलं होतं. त्यानंतर दुपारी त्यांच्या दुचाकीला कारची धडक बसली.