Eknath Shinde: "माझी बायपास सर्जरी झाली, एकाही ठाकरेंचा फोन नाही; एकनाथ शिंदे तीनवेळा भेटून गेले"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 06:29 PM2022-07-16T18:29:25+5:302022-07-16T18:52:54+5:30
शिवतारेंनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले, उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली नाही.
मुंबई/पुणे - शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतारे यांचं शिवसेना सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, हकालपट्टी काय मी स्वत: पत्रकार परिषद घेत माझी भूमिका स्पष्ट केली आहे असंही शिवतारे म्हणाले. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही केले.
शिवतारेंनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले, उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली नाही. ते मुख्यमंत्री असताना अनेक मागण्यांचे पत्र मी लिहिली. त्यावर काहीच निर्णय झाला नाही. उत्तरही दिले नाही. ज्यांनी १५ वर्ष मतदारसंघ बांधला त्यांना दुसऱ्या मतदारसंघातून लढा असा निरोप दिला जातो हा काय प्रकार आहे. संजय राऊतांची निष्ठा कुणाशी आहे हे जनतेला माहिती आहे. जे महाराष्ट्राला कळतं ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना का कळत नाही? असा सवालही शिवतारेंनी विचारला.
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक नेते माझ्या संपर्कात आहेत. मी तर अशीच उडी मारली, पण सगळ्यांना तेवढी डेरिंग नसते. काही फरक पडत नाही. देवेनभाऊ जेथे आहे, एक कर्तबगार माजी मुख्यमंत्री, प्रचंड रिस्पेक्ट मला त्यांच्याबद्दल. रिझल्ट ओरिएन्टेड मॅन. त्यांच्यासोबत आता ग्रासरुटला वाढलेले दिघेंचे चेले, मी 10 वर्षे त्यांच्यासोबत काम केलंय. कार्यकर्त्यांना सांभाळणे, आमदारांना सांभाळणे, त्यांच्या गोष्टी बघणे, त्यांच्या सुख-दुखात सहभागी होणे. माझं बायपास झालं, एकाही ठाकरेंनी मला फोनसुद्धा केला नाही. पण, एकनाथ शिंदे तीनवेळा हॉस्पीटलला येऊन गेले. त्यामुळेच, अशी माणसं जेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतील, तेव्हा नक्कीच महाराष्ट्राचं भलं होईल, असेही शिवतारे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.
संजय राऊत यांना स्किझोफ्रेनिया
राऊत यांना स्किझोफ्रेनिया आजार झाला असावा. राऊतांना आपल्यालाच सगळं कळतं असा भास होतो. ते आपल्याच विचारांच्या गर्तेत असतात. मेडिकल टर्ममध्ये सिझोफ्रेनिया आजार आहे. या आजाराच्या माणसाला काहीच प्रॉब्लेम नसतो. हुशार माणसाला हा आजार होतो. ही माणसं अतिविचाराच्या गर्तेत जातात. त्यातून त्यांना वेगवेगळे भास होतात. गोव्यात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही हा भास राऊतांना झाला. आदित्य ठाकरेंना घेऊन गेले आणि तिथे तमाशा झाला. नोटापेक्षाही कमी मते शिवसेनेच्या उमेदवारांना मिळाली. हिंदुत्वाच्या मुद्दयावर योगी सरकारला आव्हान देण्यासाठी गेले त्याठिकाणी १३९ उमेदवार उभे केले. सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले. दिल्ली काबीज करू आणि उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करू म्हणतात हा तिसरा भास आहे. चुकीच्या प्रकारे विधाने करून ते बिंबवतात. त्यामुळे राऊतांना हा आजार जडलाय का? असा प्रश्न उभा राहतो असा खोचक टोला शिवतारेंनी लगावला.