लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ईडीच्या रडारवर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी वय, आजारपण आणि कोरोनाचे कारण पुढे करत सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) प्रत्यक्ष हजर राहण्यास नकार दिला आहे. अशात, शुक्रवारी त्यांनी ट्वीट करत मी ईडीला यापूर्वी सहकार्य केले आहे पुढेही करेन, असे म्हटले आहे.
ईडीने मला कागदपत्रांसहीत उपस्थित राहावे, असे दोन समन्स पाठविले आहेत. मी ईडीला दोन सविस्तर पत्रे पाठवून मला ‘इसीआयआर’ची कॉपी द्यावी आणि त्यांना जी कागदपत्रे हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी विनंती केली आहे. जी कागदपत्रे हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी विनंती केली आहे. जेणेकरून मला या कागदपत्रांची जुळवाजुळव करून ती ईडीला पाठवता येईल. त्याचबरोबर इतर बाबींचा सविस्तर उल्लेख मी माझ्या ईडीला दिलेल्या दोन्ही पत्रांत केला आहे. मी ईडीला यापूर्वी सहकार्य केले आहे पुढेही करेन, असे ट्वीटमध्ये अनिल देशमुख यांनी नमूद केले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांनंतर देशमुखांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ईडीने आतापर्यंत दोनवेळा देशमुख यांच्या घरी छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली आहे. त्यानंतर देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदेला अटक केल्यानंतर देशमुखांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.
या छाप्यांमध्ये ताब्यात घेतलेली कागदपत्रे आणि शिंदे व पालांडे यांच्या चौकशीतून काही महत्त्वाची माहिती ईडीच्या हाती आली आहे. त्याआधारे ईडीला देशमुख यांच्याकडे तपास करायचा आहे. ईडीने पाठवलेल्या पहिल्या समन्सवेळी देशमुख यांनी वकिलांना ईडी कार्यालयात पाठवून मुदत मागून घेतली. ईडीने त्यांना २९ जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्यावेळीही देशमुख यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहता येणार नसल्याचे म्हटले आहे.