मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरविल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेणे सुरु केले आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, आम्ही त्यांच्यासोबत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.
संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासंबंधी शनिवारी (दि.२९) वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही पुण्यात भेट घेतली. छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीचा उल्लेखही या भेटीदरम्यान करण्यात आला. संभाजीराजेंच्या या भूमिकेबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न विचारण्यात आल होता. त्यावर, मराठा आरक्षणासाठी आम्ही त्यांच्यासोबत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
संभाजीराजे छत्रपती सध्या आरक्षणासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यामध्ये काहीही गैर नाही, ते मलादेखील भेटले होते. या प्रश्नावर सर्वच पक्षांनी एकत्र यायला हवं, अशी त्यांची भूमिका आहे, आमची त्यास तयारी आहे. मी संभाजीराजेंना इतकंच सांगितलं की, आम्ही मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) तिढा सोडवण्यासाठी कोणासोबतही बैठकीत चर्चेला बसायला तयार आहोत. मी केवळ एक सूचना केली. समोरच्यांनी राजकारण करु नये, एवढचं समोरच्यांनाही सांगावे, असे फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेचे स्वागत केले. संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी राज्यातील सर्व नेत्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबतच असल्याचं फडणवीसांनी म्हटलं.
संभाजीराजेंनी सरकारला दिला इशारा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला शुक्रवारी तीन पर्याय सुचविले आहेत. तसेच आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत समाजाच्या विकासासाठी पाच मागण्याही सरकारसमोर मांडल्या आहेत. हे तीन पर्याय आणि पाच मागण्यांवर येत्या ६ जूनपूर्वी या मागण्यांवर ठोस कार्यवाही करावी. अन्यथा, शिवराज्याभिषेक दिनी किल्ले रायगडावरून आंदोलनाची हाक देवू. कोरोना वगैरे काही पाहणार नाही, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे.