Ashok Chavhan ( Marathi News ) : मुंबई- 'मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यात्वाचा राजीनामा दिला आहे, पक्षाच्या वर्किंग कमीटीचाही राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा काँग्रेस पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले. मला कोणाबद्दल तक्रार करायची नाही. मला कोणाबद्दल व्यक्तीगत काही बोलायचे नाही. या पुढची राजकीय दिशा मी दोन दिवसात निर्णय घेईन अजुनही ठरवलेले नाही, अशी प्रतिक्रीया अशोक चव्हाण यांनी दिली. काँग्रेस पक्षाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच अशोक चव्हाण यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता पाहतेय; नाना पटोलेंचा चव्हाणांवर हल्लाबोल
"भाजपची कार्यप्रणाली मला अद्यापही माहिती नाही, भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मी अजुनही घेतलेला नाही. प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे असं नाही. माझ्या जन्मापासून मी काँग्रेसचे काम केले आहे, मला वाटतं आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले. मला कोणत्याही पक्षांतराची जाहीर वाच्यता करायची नाही. मला कोणाचीही उणीदुणी काढायची नाही, मला वाटतं आता वेगळ्या पर्यायाचा विचार केला पाहिजे, असंही अशोक चव्हाण म्हणाले.
मी कालपर्यंत काँग्रेस पक्षाच्या मिटींगमध्ये होतो, कालपर्यंत मी पक्षासोबत होतो. आज मी पक्षाचा राजीनामा दिला आहे, पुढची दिशा मी दोन दिवसात ठरवणार आहे. मी कोणत्याही काँग्रेस आमदारासोबत संपर्क साधलेला नाही, अशी प्रतिक्रीया अशोक चव्हाण यांनी दिली. मी राज्याचा मंत्री असताना सुद्धा इतर पक्षातील आमदारांना मदत केली आहे. कोणालाही भेदभाव केला नाही, मी सर्वांना निधी दिला, अशोक चव्हाण यांना पक्षाने मोठं केलं, पण मीही पक्षासाठी भरपूर केलं असंही चव्हाण म्हणाले.
भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही
मी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे, अजुनही पुढचा निर्णय घेतलेला नाही. दोन दिवसात पुढचा निर्णय घेणार आहे. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असंही अशोक चव्हाण म्हणाले.