मुंबई - महापौरांना प्रशासकीय किती अधिकार असतो हे सगळ्यांना माहिती आहे. उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थायी समितीत जे काही झाले त्याबाबत कुठेही प्रश्न विचारले जात नाही. तपास यंत्रणांना सहकार्य केले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही शिकवण आहे. प्रत्येक गोष्टीला एक नागरीक म्हणून जे आहे ते बाहेर येईलच अशी प्रतिक्रिया माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
किशोरी पेडणेकरांनी सोमय्यांवर निशाणा साधताना म्हणाल्या की, ज्यारितीने उघडे-नागडेबाबा बोलताये, उत्तर द्यावीच लागतील. तर तुम्ही ज्यांच्याविरोधात कागद फडकावून मोठमोठे आरोप करत होता, कोल्हापूरला गेला होता ते आता मंत्री कसे झाले याचेही उत्तर तुम्हाला द्यावे लागेल. तुम्ही दरवेळी दबावतंत्राचा वापर करून चुकीचे कागदपत्रे पुढे करत होते. मला गर्व आहे मी महापौर होते आणि नागरिकांसाठी चांगले काम केलंय. त्यामुळे चौकशीला सामोरे जात आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच महापालिकेच्या कुठल्याही घोटाळ्याशी माझा संबंध नाही. जर महापालिकेचे अधिकारी, कंत्राटदार त्यांनी मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला असेल तर निश्चित त्यांची चौकशी झाली पाहिजे. आम्ही त्यांना पाठिशी घाला असं म्हणणार नाही. परंतु जाणुनबुजून तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले ते आता मोदींच्या गोदीत गेले तेव्हा त्यांच्यावरील आरोप संपले. मुंबईकरांना याचे उत्तर द्या असंही किशोरी पेडणेकरांनी म्हटलं आहे.
ईडीनं दिले होते समन्सकोरोनाकाळात मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना समन्स जारी करत आज २३ नोव्हेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वी ८ नोव्हेंबर रोजी पेडणेकर यांना समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी त्या ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या. पेडणेकरांनी आपल्या वकिलाला ईडीच्या कार्यालयात पाठवले होते व या प्रकरणाची कागदपत्रे गोळा करण्यासाठी आपल्याला चार आठवड्यांचा कालावधी हवा असल्याची मागणी केली होती.याच प्रकरणात ७ नोव्हेंबर रोजी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी.वेलारसू यांचा ईडीने जबाब नोंदवला आहे.