Join us

संजय राऊतांसोबत माझी मैत्री नाही, पण... फडणवीसांचा 'सामना'वीरास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 8:58 AM

तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेलं हे ऑटो रिक्षा सरकार आहे.

मुंबई - गेल्या महिनाभर चाललेल्या सत्तासंघर्षातून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. या सत्तेच गणित राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जुळवून दाखवलं. या काळात संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर शाब्दीक बाण चालवून भाजपा नेत्यांना घायाळ केलं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यातूनही ते दिसून आलं. 

एबीपी माझाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्तासंघर्षावर आपलं मत मांडलं, तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेलं हे ऑटो रिक्षा सरकार आहे. रिक्षा कितीही चांगली असली तरी तिला वेगमर्यादा असतात. या सरकारमध्ये अंतर्गत विरोध खूप आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने हे सरकार कितपत चालेल हे आता सांगता येत नाही. मात्र शिवसेनेने आजही साद दिली तरी आमचे दार उघडेच आहे. आम्ही कधीही हाक द्यायला तयार आहोत पण समोरुन प्रतिसाद यायला हवा असं त्यांनी सांगितले. मात्र, महायुतीमधील दोस्तीमध्ये जी कुस्ती पाहायला मिळाली, त्यामुळे भाजपा नेते आणि देवेंद्र फडणवीस यांना जिव्हारी लागलं आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदांच्या माध्यमातून भाजपावर केलेला हल्लाबोलही देवेंद्र फडणवीस विसरले नाहीत. याच मुलाखतीत संजय राऊत यांच्याबद्दल तुमच्या भावना काय? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना फडणवीस यांनी संजय राऊतांना सल्ला दिला आहे. संजय राऊत यांच्याशी माझी मैत्रीवगैरे नाही, पण माझे त्यांच्याशी संबंध आहेत. ते दिल्लीत असतात म्हणून त्यांच्याशी फार कमी संबंध येतो. मी मोजक्या वेळेसच त्यांना भेटलेलो आहे. मला असं वाटतं की संजय राऊत ज्यावेळी बोलतात किंवा ज्यावेळी लिहितात. त्यावेळी, देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्याबद्दल त्यांनी संयम पाळणं आवश्यक आहे. कदाचित त्यांनी हे करून दाखवलं असं असेलही, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांबद्दल व्यक्त केलं आहे. 

दरम्यान, लोकसभेत सोबत लढलो आणि विधानसभेसाठी वेगळे झालो, हे योग्य वाटणार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकही शिवसेनेत सोबत लढा असा संदेश आम्हाला दिल्लीतून आला होता. त्यानुसार आम्ही एकत्र निवडणूक लढवली आणि जनतेनंदेखील आम्हाला कौल दिला. मात्र, शिवसेनेनं जनादेशाचा विश्वासघात केला, असं टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी सोडलं. 

टॅग्स :संजय राऊतदेवेंद्र फडणवीसमुंबईशिवसेनाराजकारण