मुंबई - राष्ट्रीय राजकारणातील घडामोडींना अनुसरुन हा निर्णय मी घेतला आहे. माझी एक प्रामाणिक भावना अशी आहे की, 2022 साली हा देश जगातील सर्वात तरुण देश असणार आहे. त्यामुळे, आता जे सरकार सत्तेत असणार आहे, ते सरकार पुढच्या 20 ते 25 वर्षांच्या योजनांची आखणी करणार सरकार हवं आहे. केवळ भावनिक मुद्द्यांवरन दगड उचलायला लावण्यापेक्षा दगड रचणारी तरुणाई आपल्याला हवी आहे, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
देशातील राष्ट्रीय राजकारण जे गोष्टी घडतायेत, त्यामध्ये मुलींच्या कपडे परिधान करण्यावर बंधने, मुलांच्या खाण्या-पिण्यावर बंधने हे कितपत योग्य, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारला टोलाही लगावला. तरुणाईला ही वाट आणि दिशा देण्याची क्षमता पवार साहेबांमध्ये आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवत असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या पहिल्यात यादीत शिरुर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली.
शिवसेना सोडण्याची काही वैयक्तिक कारणं आहेत. याबाबत मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोललो आहे. मात्र, मला डावलण्यात आलं किंवा माझ्यावर अन्याय झाला असं काहीही नाही. मला नेहमीच शिवसेना नेते आणि शिवसैनिकांकडून प्रेम मिळालं आहे. पण, मी साडे चार वर्षांच्या काळात गेल्या 2 वर्षांपासून शिवसेनेत सक्रीय नाही. कुठल्याही मोठ्या निवडणुकीत मी सहभाग घेतला नाही. मी उमेदवारीसाठी नाही, तर या पक्षाचे, नेतृत्वाचे विचार पटले म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी अमोल कोल्हे यांनी हे स्पष्टीकरण दिले.