Join us  

माझी प्रॉपर्टी वाढविण्यासाठी आलेलो नाही; एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 8:12 AM

आपल्यापैकी अनेकांनी उद्धव ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण यश मिळाले नाही. तेव्हाच हे पाऊल उचलावे लागले, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई : आमच्यावर खोके आणि गद्दार असा आरोप केला जातो. मात्र आम्ही निष्ठावंत आहोत. आम्ही लोकांनी क्रांती केली आहे. हा खूप मोठा उठाव आहे. मी माझी प्रॉपर्टी वाढवण्यासाठी हे केलेले नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

माझ्यावर होणाऱ्या आरोपांचे उत्तर मी कामातून देईन. मी २०२४ मध्ये मुख्यमंत्री होईन का, ते सांगता येत नाही. ते लोक ठरवतील. मी राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही शिंदे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. महाविकास आघाडीत असताना आमदारांची कामे होत नव्हती. शिवसेनेचे आमदार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. राज्यात आमचे सरकार असूनही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नव्हता.आपल्यापैकी अनेकांनी उद्धव ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण यश मिळाले नाही. तेव्हाच हे पाऊल उचलावे लागले, असेही त्यांनी सांगितले.

आमचे प्रो-पीपल, प्रो-डेव्हलपमेंट सरकार असेल. आम्ही तीन महिन्यांत बरेच चांगले निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केले. शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त मदत केली. देशात सर्वांत जास्त पायाभूत सुविधांचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्रात मोठमोठे प्रकल्प देऊ, चिंता करू नका, असा शब्द पंतप्रधानांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्ग हा तर गेमचेंजर प्रकल्प 

समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होईल. हा गेमचेंजर प्रकल्प आहे. या महामार्गालगत नवनगर, नोडस, नॉलेज सिटीज, प्रोसेसिंग युनिट उभारण्यात येणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरे