मुंबई : मी माझा हात ३० जूनलाच त्यांना दाखविला आहे. मी जे काही करतो ते दिवसाढवळ्या आणि उघडपणे करतो. तुमच्यासारखे लपूनछपून काही करत नाही. त्यामुळे आम्हाला कोणत्याही मंदिरात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योतिष प्रकरणावरून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना दिले आहे. आपण कामाख्या देवीच्या दर्शनाला गुवाहाटीला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी आपले सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करून शिर्डीच्या साईबाबांचे सपत्नीक दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सिन्नर येथे जाऊन एका ज्योतिषाला हात दाखविल्याने आणि पूजाअर्चा केल्याने शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला हात दाखविणे शोभणारे नसून मुख्यमंत्री अंधश्रद्धा पसरवत असल्याचा हल्ला राष्ट्रवादीकडून चढविण्यात आला. या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.
आत्मविश्वासाला धक्का लागलेले लोकच ज्योतिषाकडे जातात, अशी टीका शरद पवार यांनी शिंदे यांच्यावर केली होती. त्यावर माझ्यात आत्मविश्वास होता म्हणूनच ५० आमदार आणि १३ खासदार माझ्यासोबत आले. मी जे करतो ते निधड्या छातीने करतो. मी सिन्नरला जेथे गेलो तेथे सर्वांदेखत आणि मीडियासमोर गेलो, असे शिंदे म्हणाले.
शेतमालाच्या भावासाठी शिष्टमंडळ नेणार सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या समस्या रास्त असून, सोयाबीन आणि कापसाच्या भावासाठी लवकरच केंद्राकडे राज्याचे शिष्टमंडळ घेऊन जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या मागण्यांबाबत आक्रमक भूमिका घेत जलसमाधी आंदोलनासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांसह मुंबईत दाखल झाले होते. या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुपकर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी हे आश्वासन देण्यात आले. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, सोयाबीनला किमान ८ हजार ७०० रुपये आणि कापसाला १२ हजार ७०० रुपये भाव स्थिर रहावा यासाठी सोयापेंड निर्यातीला प्रोत्साहन द्यावे आदी मागण्यासाठी हे आंदोलन झाले.कृषी कर्जासाठी सीबिलची अट रद्द, १०० टक्के पीकविमा देण्यासाठी कंपन्यांना बाध्य करणार आदी मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या.