मुंबई- खार पोलीस स्थानक परिसरात झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या आज खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. शिवसेनेच्या हल्लेखोर गुंडांवर कारवाई झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली. तसेच खोट्या सहीनिशी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी खोटी तक्रार नोंदवल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनी केला आहे.
शिवसेनेच्या ७० ते ८० गुंडांनी माझ्यावर हल्ला केला होता, ते प्रकरण दाबण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशाने बांद्रा पोलीसांनी एक खोटा एफआयआर रजिस्टर केला. तो खार पोलीस स्टेशनला पाठवण्यात आला, आज दोन तास खार पोलिसांनी मला बसवलं, एफआयआर घेतो असं सांगितलं. मात्र नंतर मुंबई पोलीस आयुक्तांना फोन आला आणि ते सर्व कागदपत्र फाडून टाकले असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वत: एक फर्जी एफआयआर केली आणि त्यात लिहिलं किरीट सोमय्या असं म्हणतात की, फक्त एकच बारीक दगड लागला. ही एफआयआर आहे. तिथं कोणीच नव्हतं असं लिहिलंय. एफआयआरची भाषा वाचल्यावर लक्षात येतं की मधला भाग गायब आहे. फर्जी एफआयआर हे माफिया सेनेचे सरदार उद्धव ठाकरेच करु शकतात, अशी टीका किरीट सोमय्यांनी केली.
माझी तिसऱ्यांदा हत्या करण्याचा प्रयत्न कशासाठी केला गेला. कारण माफिया सेनेचे जितके काही छोटे-मोठे सरदार आहेत सगळ्यांचे घोटाळे बाहेर आले. अनेकांच्या प्रॉपर्टी जप्त झाल्या. अनेकांना अटक झाली, अनेक जेलमध्ये आहेत, अनेक रुग्णालयात आहेत. अमुक जामीनावर आहे. म्हणून ठाकरे सरकार आता घाबरायला लागली आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले. मनसुख हिरेननंतर किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. पण किरीट सोमय्याच्या पाठीशी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेचं प्रेम आहे. त्यामुळे ठाकरे सरकार माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.
दरम्यान, किरीट सोमय्यांच्या गाडीवर खार पोलीस स्टेशनबाहेर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्याची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (CISF) गंभीर दखल घेण्यात आली असून, झेड दर्जाची सुरक्षा असलेल्या सोमय्यांवर यापूढे हल्ला झाल्यास 'शूट अॅट साईट'चे आदेश देऊ, असा कठोर पवित्रा CISF ने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.