मुंबई - माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. माझी हकालपट्टी करण्यात आलेली नाही. त्याआधीच मी राजीनामा दिला आहे आणि उद्धव ठाकरे अशी किती जणांची हकालपट्टी करणार आहेत?, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला. तसेच, तेल लावलेल्या पैलवानाची बुद्धीने काम केलं, शरद पवारांनीच शिवसेना संपवली, असा घणाघात रामदास कदम यांनी केला. कदम यांनी तब्बल पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, त्यांना अश्रू अनावर झाल्याने ते ढसढसा रडल्याचं पाहायला मिळालं.
बाळासाहेब आज असते तर जे घडलं आहे ते घडलंच नसतं. शरद पवारांना बाळासाहेब हयात असताना जे जमलं नाही, ते त्यांनी उद्धव ठाकरेंकरवी करुन घेतलं. शरद पवारांनी शिवसेना फोडली, असा थेट आरोप त्यांनी केला. यावेळी, अजित पवारांनी कशाप्रकारे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना ताकद दिली, कशाप्रकारे निधी देऊन त्यांचा पक्ष वाढवला आणि शिवसेनेचं खच्चीकरण केलं, असेही त्यांनी बोलताना पालघरमधील एका सरपंचाच्या उदाहरणासह सांगितलं.
रामदास कदम यांनी मनातील खंत आणि खदखद बोलून दाखवली. शिवसेना पक्षात 52 वर्षे संघर्ष केला. मात्र, शिवसेनेची आजची अवस्था पाहवत नाही, हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. शिवसेनेसाठी आम्ही संघर्ष केला, अनेक केसेस अंगावर घेतल्या. म्हणूनच आम्ही शिवसेना आणि भगवा सोडून कुठेही जाणार नाही. माझ्याकडे गेल्या पावणेतीन वर्षांपासून दुर्लक्ष केलं जात आहे. गेल्या 6 महिन्यांपासून मी उद्धव ठाकरेंकडे भेटण्यासाठी वेळ मागतोय, माझा मुलगा योगश उद्धव ठाकरेंना भेटून विचारतोय, पण मला अद्यापही भेटीसाठी वेळ मिळाली नाही. आता, ते बाहेर पडले आहेत, शिवसेना भवनला जाऊन मेळावे घेत आहेत, अशी खंत रामदास कदम यांनी बोलून दाखवली.
शिवसेनेत पक्षाकडून होणारी अवहेलना मनला लागली आहे. माझ्या कुटुंबावर आणि मनावरही त्याचा परिणाम होत आहे. म्हणूनच मला नीट जेवण जात नाही, गेल्या महिनाभरापासून मी शांतपणे झोपलोही नाही. मध्यरात्री 2-3 वाजता अचानक झोपेतून उठतो, अशी अवस्था झाल्याचं दु:ख रामदास कदम यांनी आज माध्यमांसमोर मांडलं. गेल्या पावणे तीन वर्षात मी मातोश्रीची पायरी चढलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा शिवसेनेचा निर्णय योग्य नसल्याचे सांगत मी मातोश्रीतून बाहेर पडलो होतो, तेव्हापासून आजतागायत मी मातोश्रीत गेलो नाही, अशी आठवणही कदम यांनी आज माध्यमांसमोर व्यक्त केली.
मी बोललो तर भूकंप होईल, पण आज नाही
"ज्या दिवशी ही महाविकास आघाडी बनत होती. त्याचवेळी मी विरोध केला होता. पण माझं ऐकलं गेलं नाही. शिवसेनेसाठी आयुष्याची ५२ वर्ष खर्च केली. त्याच रामदास कदमला मातोश्रीवर बोलावून माध्यमांमध्ये बोलायचं नाही असा आदेश मला उद्धव ठाकरेंनी दिला. तो मी मानला. गेल्या तीन वर्षांपासून मी तोंड बंद ठेवून बुक्क्यांचा मार सहन करत आहे. तरीही आज तुम्ही माझी हकालपट्टी करायला निघालात. याबद्दल मला खूप आजही वेदना होतात. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. पण मी बोलत नाहीय. कारण मी बोललो तर भूकंप होईल. बाळासाहेबांमुळे मी अजूनही शांत आहे", असं रामदास कदम म्हणाले.