'तुझं रडण ऐकलं की मला झोप लागत नाही', शरद पवारांमध्ये दडलेला 'बाप'माणूस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 11:38 AM2019-01-27T11:38:02+5:302019-01-27T11:39:46+5:30
खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीसाठी लेख लिहिला. त्यामध्ये 'माझे बाबा' या सदराखाली लिहताना त्यांनी 'बापमाणूस' असणाऱ्या शरद पवारांचे वर्णन केलंय.
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणातील आक्रमक महिलांपैकी एक असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांबद्दल काही बाबींची उलगडा केला आहे. पवार कन्येनं वडिलांचे वर्णन करताना, पवारसाहेब हे कितीही मोठी राजकारणी, नेते, साहेब असले तरी, माझ्यासाठी ते केवळ 'माझे बाबा'च असल्याचं त्यांनी सांगितलं. राजकारणात वावरताना, समाजात फिरताना, अनेक निर्णय घेताना ते कठोर ह्रदयी वाटतात. पण, त्यांच्यात खूप हळवेपणा असून त्यांच्यातील 'बाप'माणूस सुप्रिया यांनी शब्दातून व्यक्त केलाय.
खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीसाठी लेख लिहिला. त्यामध्ये 'माझे बाबा' या सदराखाली लिहताना त्यांनी 'बापमाणूस' असणाऱ्या शरद पवारांचे वर्णन केलंय. राजकारणातला बाबांचा वावर, त्यांची त्यातली हातोटी, यामुळे अनेकांना ते कठोर ह्रदयी असावेत, असे वाटणं साहजिक आहे, पण प्रत्यक्षात ते तसे नाहीत. सार्वजनिक ठिकाणी आपल्या भावनांच प्रदर्शन केलेलं त्यांना आवडत नाही. मोठ्या संयमानं ते त्यावर ताबा ठेवतात. अर्थात, त्यालाही कधीतरी अपवाद ठरतोच. यशवंतराव चव्हाण गेले त्यावेळी त्यांना ही गोष्ट साधली नव्हती, हे मी स्वत: बघितलंय. माझं लग्न झालं तेव्हाही ते खूप अस्वस्थ होते, असं माझी आई सांगते. राजकारण्यांचा हळवेपणा राजकारणात करपतो. प्रदर्शन करत नसले तरी बाबांचा हळवेपणा मला खूपदा दिसला आहे.
माझं लग्न झाल्यावर मी अमेरिकेला गेले होते. तिथं पहिले काही दिवस मला मुळीच करमलं नाही. मी तिथून जेव्हा आई-बाबांना फोन करायचे तेव्हा मला आपोआप रडू यायचं. त्यावेळी एकदा बाबा मला म्हणाले, "तू फोनवर रडत जाऊ नकोस, तुझ रडणं ऐकलं की मला येथे रात्रभर झोप लागत नाही,''. परेदशात राहणाऱ्या मुलीच्या आठवणीने व्याकूळ होणारे असे बाबा मी प्रथमच अनुभवले होते, असा किस्सा पवारकन्या सुप्रिया सुळे यांनी लिहून सांगितला आहे. दरम्या, यासोबतच कुटुंब, नातीगोती, कुटुंबातील सदस्यांची आवड-निवड या सर्व बाबींचे बारकावेही सुप्रिया यांनी सांगितले आहेत. म्हणजे, सुप्रिया सुळेंनी दिग्गज राजकारणी असलेल्या शरद पवारांमध्ये दडलेला 'बाप'माणूस महाराष्ट्राला परिचीत करून दिलाय, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.