मुंबई- शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेच्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केल्यानं विरोधी पक्ष भाजपा आक्रमक झाली. मुख्यमंत्र्यांवर टीका केली तर तो महाराष्ट्राचा अपमान होतो मग देशाच्या पंतप्रधानांबाबत अशाप्रकारे नक्कल करत टीका करणं देशाचा अपमान होत नाही का? असा सवाल करत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधारी आमदारांवर तोंडसुख घेतले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नक्कल या सभागृहात केली जात असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान हे देशाचे आहेत. विधानसभेच्या सभागृहात अशाप्रकारे अंगविक्षिप्त करत असतील तर आम्ही अजिबात सहन करणार नाही. भास्कर जाधव यांनी माफी मागितली पाहिजे. कुठल्याही नेत्याची बदनामी या सभागृहात होता कामा नये. अध्यक्षांनी भास्कर जाधव यांना समज द्यावी आम्ही माफी मागायला सांगावी असं त्यांनी म्हटलं. यावेळी सभागृहात भाजपा आमदारांनी प्रचंड गदारोळ केला.
मोदींची आताची नाही, तर ते पंतप्रधान होण्यापूर्वीची नक्कल केली, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं. मी ते पंतप्रधान असल्याच्या आधी बोललो आहे. पंतप्रधान झाल्यावर असं मी बोललो नाही. मी माझे शब्द मागे घेतो आणि अंगविक्षेप मागे घेतो, असं त्यांनी सांगितलं. तसेच मी असंसदीय शब्द वापरला नाही. तरीही सभागृहाच्या भावना दुखवल्या असतील, तर सभागृहाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी मी केवळ दिलगिरी व्यक्त करत नसून सभागृहाची बिनशर्त माफी मागतो, असे भास्कर जाधव यांनी सभागृहात म्हटले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टोचले कान-
जाधव-फडणवीस आमने सामने आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात छोटेखानी भाषण केलं. महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे, कुठल्याही सन्माननीय व्यक्तीचा अवमान होईल, असे कृत्य कोणीही करू, नये, असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात कान टोचले.