Join us

बाळासाहेबांमुळे धाडस आणि आत्मविश्वास शिकलो, त्याच हिंमतीवर पुढे जातोय - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 9:20 PM

बाळासाहेब रिमोट कंट्रोल सर्वसामान्यांच्या हितासाठी चालवायचे. स्वत:ला काय हवं म्हणून रिमोट कंट्रोल चालवले नाही असं शिंदे म्हणाले.

मुंबई - बाळासाहेब नेहमी सांगायचे तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कोणती शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. हा अनुभव आपण सगळे घेतोय. धाडस आणि आत्मविश्वास या दोन्ही आवश्यक गोष्टी बाळासाहेबांनी दिल्या. त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. मी सूर्याचा भक्त आहे असं बाळासाहेब म्हणायचे. हिंदुत्वाचा भगवा रंग सगळीकडे पसरलेला पाहायचा आहे हा बाळासाहेबांचा विचार आहे. तोच विचार घेऊन आम्ही बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेतोय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांचे तैलचित्र अनावरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आजचा दिवस सगळ्यांसाठी आनंदाचा आणि महत्त्वाचा आहे. बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी आजचा कार्यक्रम अनमोल आहे. मी खासकरून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मनापासून अभिनंदन करत धन्यवाद व्यक्त करतो. बाळासाहेबांच्या जयंतीदिनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. शिवसेनाप्रमुखांमुळे माझ्यासारखे असंख्य सर्वसामान्य शिवसैनिक आज या विधानसभा, लोकसभेपर्यंत पोहचू शकले. व्यासपीठावर अनेकजण आहेत. समोरही अनेकजण आहेत. ज्यांना पाहत ज्यांच्या विचारांनी माझ्यासारखे कार्यकर्ते प्रभावित झाले. वयाच्या १६ व्या वर्षीपासून बाळासाहेबांची भाषणे ऐकत, त्यांच्यासोबत काम करत त्यांचे आदेश पाळत इथपर्यंत पोहचलो. बाळासाहेबांच्या विचारांचे सरकारही आपण स्थापन केले असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी मुख्यमंत्री असताना विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांचे तैलचित्र लावले जाते हा माझ्यासाठी दुर्मिळ योग आणि महत्त्वाचा क्षण आहे. एकेकाळी महाराष्ट्रात काही ठराविक घराण्यांची सत्ता होती. बाळासाहेबांनी ती सत्ता सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचं काम केले. शिवसेनेचे बहुतांश आमदार, खासदार यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. बाळासाहेबांच्या परिसस्पर्शाने त्यांचे सोने झाले. विविध जबाबदाऱ्या पेलण्याची संधी मिळाली. हे केवळ बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शक्य झाले. शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होतो, आमदार होतो, खासदार होतो. ही जादू बाळासाहेबांची होती असंही एकनाथ शिंदे म्हणाले. 

बाळासाहेबांनी कधी तडजोड केली नाहीमुस्लीम बांधव मातोश्रीत आले. त्यांची नमाजाची वेळ झाली तेव्हा बाळासाहेबांनी मातोश्रीवर नमाज पठण करायला गेले. पाकिस्तानबद्दल गोडवे गाणाऱ्यांबद्दल बाळासाहेबांचे काय मत होते हे जगाला माहिती आहे. बाळासाहेबांची शिकवण, त्यांचा वारसा, विचार, मूलमंत्र ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण, बाळासाहेबांनी कधीही जातीपातीचा विचार केला नाही. मतांचे राजकारण केले नाही. जो काम करेल त्याला पुढे आणण्याचं काम केले. बाळासाहेब प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांच्या हिंदुत्वात देशभक्ती भरली होती. मतांवर डोळा ठेऊन राजकारण केले नाही. सत्तेसाठी बाळासाहेबांनी तडजोड केली नाही. मुख्यमंत्रिपदासाठी विचारांची तडजोड केली नाही हेदेखील बाळासाहेबांकडून आम्ही शिकलोय. हाच आदर्श घेऊन आम्ही काम करतोय असं शिंदेंनी सांगितले. 

रिमोट कंट्रोल स्वत:साठी चालवला नाहीबाळासाहेब रिमोट कंट्रोल सर्वसामान्यांच्या हितासाठी चालवायचे. स्वत:ला काय हवं म्हणून रिमोट कंट्रोल चालवले नाही. याचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत. मराठी अस्मितेचे रक्षण, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यातून बाळासाहेबांनी नेतृत्वाची फळी निर्माण केली. त्यातूनच विधानसभेत, लोकसभेत अनेकजण पोहचले. बाळासाहेबांच्या विचाराने तरूण प्रेरित झाले. विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम आपण सगळे मिळून करतोय असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 

टॅग्स :एकनाथ शिंदेबाळासाहेब ठाकरेशिवसेना