मी जिवाभावाचा साथीदार गमावला, कार्यकर्त्यासाठी राजू शेट्टींची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 05:34 PM2021-05-17T17:34:15+5:302021-05-17T17:35:21+5:30
बाळासाहेब चौगुले एका रांगड्या शेतकरी कार्यकर्त्यावर श्रद्धांजलीची पोस्ट लिहिण्याची वेळ माझ्यावर आली, असे म्हणत राजू शेट्टींनी दु:ख व्यक्त केलं आहे.
मुंबई - कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेक दिग्गजांना आपण गमावलंय. रविवारीच काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाच्या वृत्ताने महाराष्ट्राला मोठा धक्का दिला. त्यामुळे, गावखेड्यातही कोरोनाची चांगलीच भीती पसरली आहे. आपल्या आप्तस्वकीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या निधनाने सर्वचजण दु:खात आहे. सोशल मीडियातून या वेदनादायी दु:खी भावनाही व्यक्त होत आहेत. आता, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनीही जिवलग मित्र गमावला आहे. त्यानंतर, त्यांनीही सोशल मीडियातून भावपूर्ण श्रद्धांजलीची भावूक पोस्ट केली आहे.
माझ्या जिव्हाळ्याची माणसं एकापाठोपाठ एक घेण्याचा सपाटाच कोरोनाने लावलेला आहे. गेल्याच आठवड्यामध्ये देशाचे माजी कृषिमंत्री चौधरी अजित सिंग आणि कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. टी. हक यांच्या श्रद्धांजलीची पोस्ट मी लिहिली आणि बाळासाहेब चौगुले एका रांगड्या शेतकरी कार्यकर्त्यावर श्रद्धांजलीची पोस्ट लिहिण्याची वेळ माझ्यावर आली, असे म्हणत राजू शेट्टींनी दु:ख व्यक्त केलं आहे.
हेरवाड (ता. शिरोळ जि.कोल्हापूर) या गावचे बाळासाहेब चौगुले यांचे कोरोनाने निधन झाले. शेतकरी गडी रांगडा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल असंच ती त्यांची बुलेट, दररोज सकाळी साडे पाचला मला त्या बुलेटचं आणि बाळासाहेबांचे दर्शन घडायचं, मी फिरायला बाहेर पडलो कि नेमकं त्याच वेळी बाळासाहेब बुलेट वरून गुलाबाची फुले घेऊन मिरज मार्केटला जायला निघायचे. रस्त्यात मी भेटणार हे माहीत असल्यामुळे हमखास माझ्यासाठी चार-पाच गुलाब एकत्र करून एक गुच्छ तयार करून घेऊन यायचे आणि माझ्या हातात दिल्याशिवाय त्यांना चैन पडायचे नाही. एखाद्या वेळेस मी बाहेरगावी गेलो असलो तरी न चुकता आमच्या घरी पोहोचत असे. असे हे बाळासाहेब संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते संघटनेचं कोणतंही आंदोलन किंवा मोर्चा असो किंवा अजून काही उपक्रम असो पहिल्या फळीत असायचे. एवढा मोठा धिप्पाड गडी कोरोनाशी झुंज देता देता हरला आणि मी जिवाभावाचा साथीदार गमावला, अशा या सवंगड्याला भावपूर्ण श्रद्धांजली, अशी भावनिक पोस्ट राजू शेट्टी यांनी फेसबुक अकाऊंटवरुन लिहिली आहे.