ओवाळिते मी लाडक्या भाऊराया, भाऊबीज निमित्त बहीण-भावाच्या प्रेमाचे अतूट बंधन दृढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 02:30 AM2017-10-22T02:30:20+5:302017-10-22T02:30:35+5:30
दिवाळी सण आनंदाचा, उत्साहाचा! नात्यातील दुरावा दूर सारत स्नेहबंध वाढविण्याचा. त्यातच दिवाळीतील भाऊबीज म्हणजे, बहीण-भावाच्या प्रेमाचे अतूट बंधन दृढ करण्याचा दिवस.
मुंबई : दिवाळी सण आनंदाचा, उत्साहाचा! नात्यातील दुरावा दूर सारत स्नेहबंध वाढविण्याचा. त्यातच दिवाळीतील भाऊबीज म्हणजे, बहीण-भावाच्या प्रेमाचे अतूट बंधन दृढ करण्याचा दिवस. पूर्वी घरोघरी बहीण भावाचे औक्षण करून हा दिवस साजरा केला जायचा, परंतु आता हा सण साजरा व्यापक स्वरूपात साजरा केला जात आहे. अनाथ, उपेक्षित, निराधार बहिणींची आणि भावांचीही आठवण ठेवत, शहर-उपनगरातील अनेक संस्था-संघटनांकडून भाऊबिजेचे आयोजन केले जात आहे. त्यामुळेच नात्यातील प्रेम आणि समाजातील स्नेहबंध अधिक दृढ होऊ लागले आहेत. पुढच्या पिढीसमोर एक चांगला आदर्श ठेवला जात आहे.
शनिवारी भाऊबिजेच्या खरेदीसाठी दुकानात मोठी गर्दी होती. त्यातच लग्न होऊन पहिल्यांदाच सासरी दिवाळी साजरी करणाºया बहिणीला भाऊबिजेला माहेरी घेऊन येतात, त्यामुळे अशा बहीण-भावाच्या चेहºयावर आनंद पाहायला मिळत होता. घरोघरी बहिणींनी भावाचे औक्षण केले, तर भावांनी तिच्या रक्षणासाठी जबाबदारी मनोमन उचलली. त्याचबरोबर, अनाथ, उपेक्षित, निराधार बहिणींची आणि भावांचीही आठवण ठेवत, शहर-उपनगरातील अनेक संस्था-संघटनांनी शनिवारी आगळीवेगळी भाऊबीज साजरी केली. सामाजिक उपक्रमांच्या या भाऊबिजेबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि दीपोत्सवांचेही आयोजन शहरात करण्यात आले होते. या वेळीही अनेक गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतही करण्यात आली.