मुंबई: रिल्स स्टारवर खूप मोठी जबाबदारी आहे. केवळ भंकसपण करता कामा नये, तर महाराष्ट्रात होत असलेल्या चुकीच्या गोष्टीवर तुमच्या रिल्समार्फत प्रबोधन झाले पाहिजे; पण राजकारण ज्या थरावर गेले त्या थरावर तुम्ही जाऊ नका, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रिल्स स्टार्सना मंगळवारी दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या इंस्टाग्रामवर रिल्सद्वारे आंतरराष्ट्रीय लोकप्रियता मिळवलेल्या 'रिल'कर्त्यांचा 'रिलबाज २०२३' हा पुरस्कार सोहळा मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी मार्गदर्शन केले. राज ठाकरे म्हणाले की, रिल करणारे जे करतात ते महत्त्वाचे आणि मोलाचे आहे. गायक, लेखक, कलाकार, सिने, साहित्य, नाट्य, गायन, शास्त्रीय संगीत असेल या विविध अंगामध्ये आज तुम्हीदेखील येता, असं राज ठाकरेंनी सांगितले.
सदर कार्यक्रमात अनेक किस्से घडले. यामध्ये राज ठाकरेंचं भाषण सुरु होताच उपस्थितांमधून कोणतरी मोठ्या 'आय लव्ह यू राजसाहेब', असं म्हटलं. यावर लगेच 'लव्ह यू' असं राज ठाकरे देखील म्हणाले. राज ठाकरेंच्या या विधानानंतर सभागृहात एकच शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, रिल्समध्ये संपूर्ण समाज गुंतवून टाकण्याची ताकद आहे. समाज तुमच्यात गुंततो, रममाण होतो. देशात जर असे मनोरंजन नसते तर देशात अराजक आले असते. आशाताई भोसले यांचा माझ्या हस्ते सत्कार होता. त्यावेळी मी एक गोष्ट सांगितली होती. तुम्ही किती महत्वाचे काम करता, याची जाणीव तुम्हाला व्हायला हवी. मला वाटते महाराष्ट्रातील डान्सबार जेव्हा बंद झाले. त्यावेळी लागलेली सवय ती या रिल्सच्या माध्यमातून पूर्ण झाली. एकएकटे बसलेले असतात, काय सुरू आहे काही कळत नाही. माझ्या नजरेत काही जण येतात, असंही राज ठाकरेंनी सांगितले.
अमित ठाकरेंची घेतली फिरकी-
हा कार्यक्रम सुरू असताना मी आत बसलो होतो. त्यावेळी अमित ठाकरेंबाबत घोषणा देण्यात येत होत्या. अमित ठाकरे अंगार है, बाकी सब भंगार है...! बाकीच्या भंगारमध्ये मी तर नाही येत नाही, अशी मिश्कील टीप्पणी राज ठाकरेंनी केली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसेच, मला अमितने सांगितलं, तू ये, दोन मिनिटे बोल आणि निघ. मी सहसा घरच्यांच्या विरोधात जात नाही. त्यामुळे बोलणार आणि निघून जाणार आहे, अशा शब्दांत त्यांनी अमित ठाकरे यांची फिरकी घेतली. घरच्यांच्या विरोधात मी जास्त बोलत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
अथर्व सुदामे राज ठाकरेंचा आवडता रिल्स स्टार-
आपलं भाषण सुरु असतानाच राज ठाकरेंना समोर अथर्व सुदामे दिसला आणि त्यांनी थेट माईकवरुनच त्याच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. "अरे तू पण आलायस का? हा माझा आवडता अत्यंत. हा हा उभा राहा!" असं राज ठाकरेंनी म्हणताच सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. राज ठाकरेंनी सांगितल्यानंतर अथर्व जागेवर हसत उभा राहिला आणि त्याने वाकून आपल्या जागेवरुन राज ठाकरेंनी केलेल्या कौतुकाला नमस्कार करत प्रतिसाद दिला.