Join us  

‘आई गं, कुछ कुछ होता है रे’चा सखींनी घेतला आस्वाद

By admin | Published: October 12, 2014 11:45 PM

आजवर मुंबईतील चाळींवर बेतलेली बरीच नाटकं रंगभूमीवर येऊन गेली. पण ‘आई गं कुछ कुछ होता है रे’.. हे नाटक मुंबईतील गावठाणं, जिथे आगरी कोळी व इतर जाती धर्माचे लोक राहतात

ठाणे - आजवर मुंबईतील चाळींवर बेतलेली बरीच नाटकं रंगभूमीवर येऊन गेली. पण ‘आई गं कुछ कुछ होता है रे’.. हे नाटक मुंबईतील गावठाणं, जिथे आगरी कोळी व इतर जाती धर्माचे लोक राहतात, त्यावर आधारित आहे. हे नाटक एक अस्सल महाराष्ट्रीयन कॉमेडी असलेले नाटक आहे. जिथे कोळी, मालवणी, मराठी मग तो उत्तर भारतीय असो वा दक्षिण भारतीय ते सर्व एकत्र राहतात. केशव काका ( सुभाष सैद) आणि शांता काकु (विद्या जगे) हे प्रेम विवाह झालेले आंतर जातीय जोडपं. शांता काकु मालवणी तर केशव काका हे मराठा. त्यांना मूलबाळ नाही. पण ते नारायण (तुषार खेडेकर) या सर्वांची कामे करणाऱ्याला लहानाचे मोठे करतात. शांताकाकू कजाग आहे तर केशव काका हे शांताकाकूच्या पदराखाली वावरणारे.. नारायणाला इतरांची कामं करण्याव्यतिरिक्त कुठल्याच गोष्टीत आनंद मिळत नाही. तो सुशिक्षित आहे. सगळ्यांना सोबत घेऊन मिळून मिसळुन राहून लोकांची कामे करणारा. त्याला भविष्य सांगायचं वेड असते. त्याची भविष्यवाणी कधी खरी ठरत नाही. त्यामुळे नारायणचे भविष्य ऐकून अनेकांचे नुकसानच होत असते. कोल्हापुरचे कुस्ती पहिलवान (स्वप्नील रसाळ) नेहमी कुस्ती खेळण्यासाठी बाहेर असतात. त्यांची मुलगी उर्मिला (वर्षा कांबळी) ही कॉलेजतरुणी असते. तिला आपल्या वडिलांचा अभिमान असतो. आपल्या स्वप्नातला राजकुमार एक ना एक दिवस भेटेल असा तिचा ठाम विश्वास असतो. इथेच राहणार एक कोळी तरुण राजा कोळी ( उमेश ठाकूर) वडिलांना सोडून येथेच एकटा राहत असतो. तो जितेंद्र, मिथुन, गोविंदा यांचा जबरदस्त फॅन असतो. तो उर्मिलाला पटविण्याचा खुप प्रयत्नात असतो. पण त्याचे सर्व प्रयत्न वाया जातात.एके दिवशी पहिलवान कुस्ती जिंकून येतो आणि नाटकाला कलाटणी मिळते. शांताकाकू पहिलवानांच्या पहिलवानीवर फिदा होतात. ही गोष्ट काकांना खटकते. त्याचा फायदा राजा कोळी घेतो. पहिलवान आणि केशव काकांमध्ये भांडण लावून देतो. या भांडणाचा परिणाम म्हणून नारायणाला घर सोडून जावे लागते.या सगळ्या सावळ्यागोंधळातच तेथे राहणाऱ्या शेट्टी नावाच्या व्यक्तीचा आत्मा काकांच्या शरीरात प्रवेश करतो. यानंतर घडणाऱ्या गोष्टींना काकूंना चांगलाच त्रास होतो. अशातच एके दिवशी नारायण परत येतो. त्यानंतर उर्मिला आणि नारायणात प्रेमाचा रंग चढत जातो. पहिलवानाचा मात्र, याला विरोध असतो. त्यामुळे राजाला उर्मिला मिळेल का. उर्मिला आणि नारायणाच्या प्रेम प्रकरणाला सर्वांची संमती मिळेल का, शेट्टी कोण असतो..अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ‘आई गं.. कुछ कुछ होता है रे’ हे नाटक पाहिल्यावर मिळेल.हे नाटक विनोदी असून यात हिन्दी सिनेमाच्या गाण्यांची मेजवानी आह. आणि नृत्याची त्याला चांगली साथ आहे. अरविंदो मिरा निर्मित ‘आई ग कुछ कुछ होता है रे’ या नाटकाचे निर्माते नयन पवार व सुरेश नंदिरे आहेत. लेखन, दिग्दर्शन उमेश ठाकुर यांचे आहे. वयाच्या 16 व्या वर्षी दिग्दर्शन क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी लावण्या पवार हिने या नाटकाचे सह दिग्दर्शन केले असुन या नाटकात नृत्य दिग्दिर्शिकेची भूमिकाही तिने चांगल्या रितीने पार पाडली आहे. या संस्थेने आता पर्यंत अनेक बालनाट्य तयार केली असून अनेक नविन कलाकारांना संधी देण्यात अग्रक्र म ठरली आहे. सखी मंचच्या सदस्यांकरिता या नाटकाचे आयोजन ६ आॅक्टोबरला आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे करण्यात आले होते. संपर्क - सुरेश नंदिरे - 9867600300, 9146536531