"उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मी स्वतः उमेदवार असेल", संजय निरुपम यांची स्पष्टोक्ती
By मनोहर कुंभेजकर | Published: October 5, 2023 06:10 PM2023-10-05T18:10:02+5:302023-10-05T18:14:30+5:30
आघाडीतील जागा वाटपाचा तिढा इंडिया आघाडीच्या बैठकीत कसा सुटणार, याकडे राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. गेल्या शनिवारी मातोश्रीत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक झाली होती. तर यापूर्वी दि,18 मे रोजी मातोश्रीत झालेल्या बैठकीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकारांना साथ द्या! असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन शिबिरात केले होते.
आता याच मतदार संघावर माजी खासदार संजय निरुपम यांनी दावा सांगितला असून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मी स्वतः उमेदवार असेल अशी स्पष्टोक्ती संजय निरुपम यांनी दिली. त्यामुळे आघाडीतील जागा वाटपाचा तिढा इंडिया आघाडीच्या बैठकीत कसा सुटणार, याकडे राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
आपण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्या नंतर दुसऱ्या दिवसपासून मतदार संघात रोज कार्यरत असून रोज 8-10 ठिकाणी कार्यक्रमा निमित्त भेटी देतो.त्यामुळे आपण 2019 साली निवडणुकीची तयारी सुरू केली असून आपण आगामी निवडणूकीसाठी उमेदवार म्हणून सज्ज आहे. मुंबईतील सहापैकी तीन लोकसभेच्या जागांवर काँग्रेस आग्रही राहणार आहे.
उत्तर पश्चिम मुंबई , दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या तीन जागा काँग्रेससाठी महत्त्वाच्या आहेत. या तीन लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मानणारा मोठा मतदार असल्याचे त्यांनी सांगितले. 2004, 2009, 2014 आणि 2019 पर्यंत मुंबईत लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. त्यात काँग्रेस सहा पैकी पाच लोकसभेच्या जागेवर निवडणूक लढवत होते. मुंबईत सहा पैकी कमीत कमी तीन जागेवर काँग्रेसकडून उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले.