- दा. कृ. सोमण (पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक)
ही गोष्ट ७१ वर्षांपूर्वींची आहे. १९५२ ची ती दिवाळी मी कधीच विसरू शकणार नाही. त्यावेळी मी कोकणात राजापूर तालुक्यात सागवे चिंचाडी येथे राहात होतो. मी दहा वर्षांचा. चौथीत शिकत होतो. त्याकाळी आमची दिवाळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी होत असे. घरी आई लाडू, करंज्या, चकली, शेव वगैरे दिवाळीच्या फराळाचे पदार्थ करीत असे. पावसाळ्यानंतर आम्ही मुले अंगण तयार करून शेणाने सारवीत होतो. दिवाळी जवळ आली की बांबू आणून त्याच्या काड्या तयार करून षटकाेनी आकार तयार करीत असू. त्यावर रंगीत कागद चिकटवून मस्तपैकी आकाश कंदील तयार करीत होतो. माझे वडील इतरांप्रमाणेच मला खूप फटाके आणायचे. फुलबाज्या, केपा, भुईचक्र, मोठ्या आवाजाचे बार, विमाने इत्यादी फटाके असायचे.
दिवाळीत दररोज रात्री वाडीतील मुले आम्ही एकत्र येऊन फटाक्यांची आतषबाजी करायचो. तो दिवस नरक चतुर्दशीचा होता. रात्री आम्ही मुले फटाके वाजविण्यात दंग होतो. आमच्या शेजारी राहणारा सदानंद माझ्यापेक्षा मोठा होता. तो फटाके लावण्यात फार चलाख होता, धीट होता. तो आमचा लीडर होता. फटाके लावताना तो वेगवेगळे प्रयोग करीत असे. विमान पेटत पेटत आकाशात उंच जायचे. कधी कधी सदानंद त्यावर डबा ठेवत असे. विमान उडाले की डबाही उंच उडायचा. खूप मज्जा यायची. त्यादिवशी सदानंदने विमानाची वात फुलबाजीने पेटविली. विमान खूप उंच गेले आणि पेटत पेटत शेजारच्या घराच्या एका गोठ्याच्या छप्परावर पडले. गोठ्याचे छप्पर गवताचे होते. गवताने पेट घेतला. आग भडकली. आरडाओरड झाली. आम्ही सर्व मुले आणि मोठी माणसे धावत त्या गोठ्यात गेलो. गोठ्यातून आधी गाई, बैलांना बाहेर काढले. मोठ्या माणसांनी पाण्याने आग विझविली. गोठ्याचे खूप नुकसान झाले. आम्ही मुले खूप घाबरून रडायला लागलो होतो.
दुसऱ्या दिवशी वाडीतील सर्वांनी वर्गणी काढली. नंतर तो गोठा पत्रे घालून दुरुस्त करून दिला. आमचा मित्र सदानंदही घाबरला होता. त्याने दुसऱ्या दिवशी आम्हा सर्व मुलांना एकत्र बोलावले. आम्ही सर्व फटाके एकत्र केले. वाडीजवळच एका मैदानात मोठ्ठा खड्डा करून पुरून टाकले. आम्ही सर्वांनी सदानंदच्या सांगण्यावरून यापुढे कधीही फटाके न वाजविण्याची शपथ घेतली. त्या वर्षापासून गावी आमच्या वाडीत कोणत्याही वर्षी दिवाळीला फटाके लावले गेले नाहीत. मी मोठा झाल्यावर मुंबईत आल्यावर माझ्या मुलांना जेव्हा ही गोष्ट सांगितली, तेव्हा माझ्या मुलांनीही दिवाळीत फटाके न वाजविण्याचे ठरविले. अजूनही प्रत्येक दिवाळीत मला गावच्या त्या दिवाळीची आठवण येते.
... आणि अश्रू आलेपाच वर्षांपूर्वी बदलापूर येथील वृद्धाश्रमात दिवाळी निमित्त माझे भाषण आयोजित केले होते. तेथील वृद्धांशी माझे संभाषण झाले. महत्त्वाचे म्हणजे आम्ही घरातून जातानाच त्यांच्यासाठी दिवाळी फराळ घेऊन गेलो होते. भाषणादरम्यान त्यांना आकाशातील तारे दाखवले. तो दिवस १७ नोव्हेंबरचा होता. आकाशात उल्का वर्षाव होता. ते म्हणाले, आयुष्यात ही रात्र अतिशय आनंदात गेली. आकाशातील दिवाळी पाहून आम्ही या वर्षाची दिवाळी साजरी केली. त्यानंतर माझ्यासह अनेक वृद्धांच्या डोळ्यांतून अश्रू आले.