Join us

मेरे पास सिर्फ माँ है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे आई आणि वडील असे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना ठोस मदत करण्याची घोषणा राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे आई आणि वडील असे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना ठोस मदत करण्याची घोषणा राज्य शासनाने केली. परंतु, घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा (आई किंवा वडील यापैकी एकाचा) मृत्यू झाल्यास अशा बालकांचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

राज्य शासनाच्या घोषणेनुसार दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये जमा केले जातील. संबंधित बालक सज्ञान झाल्यानंतर त्याला ही रक्कम वापरता येईल. मात्र, केवळ एक पालक गमावलेल्या मुलांना ही मदत मिळणार नाही. त्यामुळे आई किंवा वडील यापैकी कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अशा बालकांचे भविष्य अधांतरीच आहे. सरकारने मदतीबाबत असा दुजाभाव न करता पालक गमावलेल्या मुलांना सरसकट मदत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.

* दीड वर्षाच्या चिमुकलीला मागे ठेवून बाबा गेला देवाघरी

१) जोगेश्वरी पश्चिमेला राहणारी दीड वर्षीय चिमुकली आजही आपल्या बाबाच्या येण्याकडे डोळे लावून बसली आहे, पण देवाघरी गेलेला तिचा बाबा पुन्हा कधीच परत येणार नाही, हे समजण्याएवढी ती माेठी नाही. मुलीसमोर रडताही येत नाही आणि तिला घरी एकटे टाकून कामालाही जाता येत नाही. मनातल्या मनात हुंदके देत जगणे असह्य झाले आहे, अशी व्यथा अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी वैधव्य पदरी पडलेल्या एका मातेने मांडली.

२) २०१९ मध्ये लग्न झाले. पुढे कन्यारत्नाच्या रूपाने लक्ष्मी घरी आली. सुखाचा संसार सुरू होता, पण कोरोनाने घात केला. ३१ वर्षीय पतीचा कोरोनाने मृत्यू झाला. पती घरात कमावता एकटाच असल्याने त्यांच्या मागे चूल पेटणेही अवघड झाले आहे. नातेवाइकांनी मदत केली, पण ती किती दिवस पुरणार, असा पेच या मातेसमोर आहे.

३) एकच पालक गमावल्याने ही चिमुकली सरकारी मदतीपासूनही वंचित राहणार आहे. ती लहान आहे तोवर ठीक, पण एकदा शाळेत जायला लागली की, खर्च कसा पेलायचा, हा प्रश्न आहे. त्यामुळे भविष्य अधांतरी असलेल्या अशा मुलांसाठी सरकारने मदत करावी, अशी मागणी या मातेने केली.

* जिल्ह्यातील कोविड रुग्णांचा आढावा

- मुंबईतील एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ७,१०,८०७

- कोरोनातून बरे झालेले रुग्ण – ६,७७,४४५

- सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - १६,१३३

- एकूण मृत्यू – १५,०१८

* मुंबईत किती बालके झाली अनाथ?

मुंबई उपनगरात कोरोनामुळे एक पालक गमावलेली ४४४ बालके आढळून आली आहेत. त्यातील सात बालकांच्या दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे. मुंबई शहरात एक पालक गमावलेल्या मुलांची संख्या १२४ आहे, तीन मुलांनी दोन्ही पालक गमावल्याचे समोर आले आहे. महिला आणि बालकल्याण विभागाकडून अशा मुलांचा शोध अद्यापही सुरू असून, संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

---------------------------------