मी महापौर बंगला सोडतोय - विश्वनाथ महाडेश्वर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 04:43 AM2018-07-14T04:43:06+5:302018-07-14T04:43:29+5:30
शिवसेनाप्रमुख हे आपल्यासाठी दैवत असून त्यांच्या स्मारकासाठी मी कधीही महापौर बंगला सोडण्यास तयार आहे. पण पर्यायी महापौर निवासस्थानासाठी मलबार हिल जलाशय बंगल्याला पालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - शिवसेनाप्रमुख हे आपल्यासाठी दैवत असून त्यांच्या स्मारकासाठी मी कधीही महापौर बंगला सोडण्यास तयार आहे. पण पर्यायी महापौर निवासस्थानासाठी मलबार हिल जलाशय बंगल्याला पालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, हे निवासस्थान सोडण्यास एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे तयार नाहीत. त्यामुळे मी शिवाजी पार्क येथील महापौर बंगला रिकामा करत असून, खार पूर्व, गोळीबार येथील माझ्या मूळ निवासस्थानी जाईन, असा इशारा पालिका आयुक्तांना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिला आहे.
आयएएस अधिकारी पल्लवी दराडे आणि प्रवीण दराडे यांच्या हट्टापायी पालिकेच्या मलबार हिल जलाशयाची दुरुस्ती रखडली आहे. या जलाशयाच्या वर असलेला पालिकेचा बंगला रिकामा करण्यास दराडे दाम्पत्य तयार नसल्यामुळे ही दुरुस्ती करता येत नसल्याची कबुली प्रशासनाने दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यायी महापौर निवासस्थानास शिवसेनेने मलबार हिल येथील पाणी खात्याच्या बंगल्याचा पर्याय सुचविला होता. मात्र डॉ. पल्लवी दराडे या सध्या त्या बंगल्यात राहत असून त्या बंगला सोडण्याचे नावच घेत नाहीत. याबाबत शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक -७च्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी विधि समितीमध्ये जून महिन्यात हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता.
प्रशासनाच्या बेजबाबदार उत्तराला शीतल म्हात्रे यांनी बुधवारी विधि समितीच्या बैठकीत आक्षेप घेतला. प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करीत म्हात्रे यांनी सभात्याग केला. त्यानंतर अध्यक्षा सुवर्णा कारंजे यांनी सभा तहकूब केली.