मुंबई : पवई येथील श्रेया या ३ वर्षांच्या चिमुरडीच्या मारेकऱ्याच्या शोध सुरू असताना, आरोपी वडाळा टीटी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. ‘हां, मैंने बलात्कार करके लडकी की हत्या की है...’ असे सांगत त्याने पोलिसांसमोर आत्मसर्पण केले. समशेर उर्फ इरफान अच्छे खान (२३) असे आरोपीचे नाव असून, त्याने रवी वामन सोलंकी (२८) या मित्राच्या मदतीने श्रेयाचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून दिला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूर येथील लाल डोंगर परिसरात इरफान राहण्यास आहे. ६ मार्चच्या रात्री तुंगा गावात भंडारा असल्याने, इरफान त्या परिसरात राहत असलेल्या रवीच्या घरी आला होता. दोघांनी त्या रात्री नशा केली आणि ते भंडाऱ्याकडे निघाले. दरम्यान, तेथे एका बाइकवर बसलेल्या श्रेयावर त्यांची नजर पडली व तिला खाऊचे आमिष दाखवून सोबत नेले. त्यानंतर कृष्णा बिझनेस टॉवरच्या पाठीमागील पडीक जागेत तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी श्रेयाची गळा आवळून हत्या केली. बेपत्ता श्रेयाचा शोध सुरू असताना पवई पोलिसांना तिचा मृतदेह सापडला होता. आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखाही समांतर तपास करत होती. तपास सुरू असतानाच, शुक्रवारी या गुन्ह्यांतील मुख्य सूत्रधार इरफान वडाळा टी. टी. पोलिसांसमोर हजर झाला. तेथे ‘मैंने ही लडकी का बलात्कार करके हत्या की है... मैंही आरोपी हूँ ...’ असे सांगून त्याने सर्व घटनाक्रम सांगितला. त्याला पवई पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्यासह या गुन्ह्यात सहभागी असलेल्या रवीला शनिवारी अटक करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनायक देशमुख यांनी दिली. (प्रतिनिधी)
‘मैंने बलात्कार करके हत्या की...’ पवई बलात्कारातील आरोपीची कबुली
By admin | Published: March 13, 2016 4:35 AM