Join us  

'मी सकाळी देवगिरी बंगल्यावर पोहोचले पण...'; सुप्रिया सुळेंनी लोकमतला दिली विशेष मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 6:54 AM

खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘लोकमत’ला दिलेली विशेष मुलाखत. 

- दीपक भातुसे

मुंबई : अजित पवार असे पाऊल उचलतील असे वाटले नाही. त्यादिवशी सकाळी मी देवगिरी बंगल्यावर पोहोचले होते. त्यावेळी अजित पवार यांच्यासोबत बैठक सुरू होती. पण... खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘लोकमत’ला दिलेली विशेष मुलाखत. 

आज दोन बैठका होत आहेत.मला त्याचेच आश्चर्य वाटते. शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत असे ते सांगत आहेत. मग पवारांनी बैठक बोलावली असताना ही दुसरी बैठक कशासाठी? आम्ही मंत्रिमंडळात सहभागी झालेले नऊ आमदार सोडून इतर सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी बैठकीचे निमंत्रण दिलेले आहे. 

या बंडामागे शरद पवारच आहेत अशी आजही चर्चा आहे, तसा आरोपही केला जात आहे.शरद पवारांनी केले असते तर ते लगेच लढायला मैदानात उतरले नसते. तसेच गेलेल्या नेत्यांविरोधात कारवाई केली नसती. मला या सगळ्याचे आश्चर्य वाटले नाही, पण धक्का बसला कारण शरद पवारांना अंधारात ठेवून हे सगळे केले गेले. आपल्या सुख-दुःखात जो उभा राहिलेला आहे त्याला सांगायला हवे होते. ऋणानुबंध असतात की नाही? यापूर्वी अनेक लोक पक्ष सोडून गेले, पण ते पवारांना अडचण सांगून जायचे. हे नऊ जण का गेले माहीत नाही, पण हे सगळे दुर्दैवी आहे. 

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंविरोधात तुम्ही अपात्रतेची याचिका दाखल करणार आहात?काल रात्रीच ती याचिका दाखल केली आहे. मी लोकसभेतील पक्षाचा नेता म्हणून सुनील तटकरेंविरोधात लोकसभा अध्यक्ष आणि सचिवांकडे याचिका दाखल केली आहे, तर वंदना चव्हाण यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात याचिका दाखल केली.

अनेक आमदार तिकडे जात आहेत.गेलेले आमदार परतही येत आहेत. पवार साहेब आमदारांच्या हृदयात आहेत. महत्त्वाचे म्हणजे आमदारांच्या मतदारसंघातील जनतेच्या मनात साहेब आहेत.

बंड झाल्यानंतर शरद पवारांना कधी भेटलात?रविवारी बंड झाले, त्यानंतर सोमवारी रात्री ते मुंबईत आल्यानंतर भेट झाली. 

बंडाचे किती आव्हान वाटते ?जे झाले ते स्वीकारून पुढे जायचे आहे, पक्षाची पुन्हा मजबुतीने बांधणी करायची आहे. हा राजकीय पक्ष आहे.

अजित पवार गटाने तटकरेंना प्रदेशाध्यक्ष केले आहे.- पक्षाच्या घटनेनुसार अध्यक्ष या नात्याने शरद पवारांना सगळे अधिकार आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्याचा अधिकार प्रफुल्ल पटेल यांना नव्हे तर महाराष्ट्राची प्रभारी म्हणून मला ते अधिकार आहेत. मात्र, ही नियुक्ती करतानाही मला अध्यक्षांची म्हणजेच शरद पवारांची परवानगी घेणेही बंधनकारक आहे. एक तर प्रफुल्ल पटेल यांना अधिकार नाहीत, दुसरे अजित पवार सांगतात शरद पवार आमचे अध्यक्ष आहेत, मग शरद पवारांची परवानगी घेतली का?

पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला जात आहे. शरद पवार अध्यक्ष आहेत, मग साहजिकच पक्ष आणि चिन्हही त्यांच्याकडेच राहणार.

महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे.महाविकास आघाडी एकसंघ राहील, त्यात कोणतीही अडचण नाही.

२०१९ ला अजित पवारांनी बंड केले तेव्हा तुम्ही भावनिक झाला होता.त्याला आता चार वर्षे झाली. चार वर्षात प्रगल्भता येते ना!

अजित पवार बंड करणार याची तुम्हाला कधी कल्पना आली?रविवारी मी सकाळी दोन तास देवगिरी बंगल्यावर अजित पवारांबरोबर होते. तेव्हा तिथे आमदार येत होते. प्रदेशाध्यक्षपदासाठी हे सुरू आहे असे तेव्हा तिथे चित्र होते. तिथून मी गेल्यानंतर हे सगळे राजभवनवर गेले आणि तेव्हा मला याची कल्पना आली. 

त्या नऊ आमदारांपैकी कुणी परत येण्यासाठी संपर्क केला तर?- त्यांनी संपर्क केला तर शरद पवार त्यांच्याशी चर्चा करतील. आम्ही नाती जपणारे आहोत.

शरद पवारांना कुणी संपर्क केला?- देशातील सगळ्या नेत्यांनी पवारांना फोन केले. सगळे आयुष्य सत्तेसाठी नसते, विचारधाराही असते. किती जण पवारांबरोबर आहेत हे महत्त्वाचे नाही. पवारांसाठी नंबर महत्त्वाचे नाहीत. कमी खासदार असतानाही पवारांचे देशातील राजकीय वजन सगळ्यांना माहीत आहे.

टॅग्स :सुप्रिया सुळेशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस