Join us

मी रोज करतो हनुमान चालिसाचे पठण; आदित्य ठाकरे; गिरगाव आणि दादरमध्ये शिवसेनेने केली महाआरती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 10:48 AM

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गिरगाव येथील हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी ठाकरे यांनी मनसेवर टीका केली. रामनवमी असो किंवा हनुमान जयंती लोकांचा सणवार आणि उत्सवातील उत्साह वाढत आहे.

मुंबई : खरी श्रद्धा ही मनात आणि हृदयात असावी लागते. राजकीय व्यासपीठावर असून चालत नाही, अशा शब्दात मनसेवर टीका करतानाच मी रोज हनुमान चालिसाचे पठण करतो, असा दावा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केला.आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गिरगाव येथील हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी ठाकरे यांनी मनसेवर टीका केली. रामनवमी असो किंवा हनुमान जयंती लोकांचा सणवार आणि उत्सवातील उत्साह वाढत आहे. आम्ही त्याला कोणताही राजकीय रंग देत नाही. खऱ्या भक्तीने दिवस साजरा करत आहोत. आमचे हिंदुत्व हे ‘रघुकुल रीत चली आये, प्राण जाये पर वचन न जाये’, या तत्त्वानुसार आहे. तोच आमचा धर्म आहे आणि आम्ही त्याचे पालन करतो, असे ते म्हणाले.धार्मिक कारणाने राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता, ‘बी आणि सी’ टीम राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे. ते यांना योग्य उत्तर देतील. शिवाय, आम्ही स्टटंबाजी करत नाही तर काम करतो, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.याशिवाय, दादर येथील गोल मंदिरातही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. वाढती महागाई, इंधर दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ही आरती करण्यात आली. यावेळी स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेना