युतीच्या होर्डिंग्जवर आठवले

By admin | Published: April 11, 2015 01:41 AM2015-04-11T01:41:23+5:302015-04-11T01:41:23+5:30

शिवसेना - भाजपाच्या काही उमेदवारांनी ठिकठिकाणी लावलेल्या प्रचाराच्या होर्डिंग्जवर रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांचे

I remember on the hoardings of the alliance | युतीच्या होर्डिंग्जवर आठवले

युतीच्या होर्डिंग्जवर आठवले

Next

नवी मुंबई : शिवसेना - भाजपाच्या काही उमेदवारांनी ठिकठिकाणी लावलेल्या प्रचाराच्या होर्डिंग्जवर रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांचे छायाचित्र लावल्याचे शुक्रवारी दिसून आले. यावर रिपाइंने आक्षेप घेऊन तीव्र संताप व्यक्त केला आहे. युतीत रिपाइंचा सहभाग नसताना आमच्या नेत्यांचे छायाचित्र वापरण्याचे प्रयोजन काय, असा सवाल करून यासंदर्भात निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याची माहिती पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहळ यांनी लोकमतला दिली.
महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या रिपाइंला युतीत स्थान मिळावे यासाठी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू होते. मात्र भाजप किंवा शिवसेना या दोन्ही पक्षांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. याचा परिणाम म्हणून रिपाइंने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊन १४ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. त्यानुसार प्रचाराची रणनीतीही ठरविण्यात आली आहे. मात्र युतीच्या काही उमेदवारांनी आपल्या प्रचाराच्या होर्डिंग्जवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत रामदास आठवले यांचेही छायाचित्र लावले आहे. वाशी प्रभाग ६० मधील युतीचे उमेदवार विठ्ठल मोरे यांनी अशाप्रकारचे होर्डिंग्ज लावल्याचे दिसून आले आहे. यावर रिपाइंने संताप व्यक्त केला आहे. केंद्रात व राज्यात महायुतीची सत्ता आली. महायुतीचा घटक पक्ष या नात्याने या सत्तांतरात आमचाही खारीचा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत योग्य स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र युतीने आम्हाला विचारातच घेतले नाही. त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. ही वस्तुस्थिती असताना युतीच्या उमेदवारांकडून आमच्या नेत्यांच्या छायाचित्राचा गैरवापर सुरू आहे. ही बाब संतापजनक असून यासंदर्भात शनिवारी निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार करणार असल्याची माहिती ओहोळ यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: I remember on the hoardings of the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.