नेस्कोच्या रक्तदान शिबिराची आठवण झाली- सुभाष देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 12:37 AM2020-11-10T00:37:28+5:302020-11-10T00:37:52+5:30
मुंबई : ‘बाळासाहेबांच्या वेळी नेस्कोत झालेल्या रक्तदान शिबिराची मला आठवण झाली,’ या शब्दात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उद्योगमंत्री सुभाष ...
मुंबई : ‘बाळासाहेबांच्या वेळी नेस्कोत झालेल्या रक्तदान शिबिराची मला आठवण झाली,’ या शब्दात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रविवारी गोरेगावच्या एफ. एम बेंक्वेट हाॅल येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे कौतुक केले. यात आयोजक दिनेश राव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी रक्ताच्या ५०४ बाटल्या अवघ्या सात तासात संकलन करण्यात यश मिळवले.
गोरेगावात ८ नोव्हेंबर, २०२० रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित या रक्तदान शिबिराला ६२१ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. ज्यात ५०४ जणांना डॉक्टरांनी तपासून रक्त देण्यास परवानगी दिली. यामध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक असले तरी महिलांनीही यात हिरिरीने पुढाकार घेतला होता. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरादरम्यान बोलताना ‘बाळासाहेबांच्या वेळी शिवसेनेला जेव्हा ५० वर्षे झालेली त्यावेळी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
यात आम्ही २५ हजार बाटल्या रक्त संकलन केले होते, त्या दिवसाची मला आज आठवण झाली,’ असे म्हणत त्यांनी आयोजक शिवसेना उपविभागप्रमुख दिनेश राव यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. मीनाताई ठाकरे रक्तदान पेढीच्या जवळपास ५० वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी हे नागरिकांना मार्गदर्शन करत होते. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने हे रेकॉर्डब्रेक रक्तदान शिबिर यशस्वी झाले असून आता तितकीच झाडे लावत निसर्ग संवर्धनातही खारीचा वाटा उचलणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला फराळाचे वाटप करत त्यांचे तोंड गोड करण्यात
आले.